Shirur : तहसीलदारांच्या गाडीचा पाठलाग करणा-या वाहनाविरुद्ध शिरूरच्या तहसीलदारांची पोलिसांकडे तक्रार

एमपीसी न्यूज- शिरूरच्या तहसीलदारांच्या गाडीचा पाठलाग होत असल्याची तक्रार शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले यांनी शिरूर पोलिसांकडे केली आहे. वाळू माफियांकडून माझ्या गाडीचा पाठलाग होत असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले यांनी दिलेल्या तक्रारी अर्जानुसार, रविवारी (दि. 2) दुपारी 3 वाजता शिरुर कार्यालयातील काम आटोपुन स्वत:च्या खासगी वाहनाने कोरेगाव भीमाकडे जात असताना, एक इनोव्हा (एम.एच.16 बी.वाय.0077) ही गाडी सातत्याने पाठलाग करत असल्याचे निदर्शनास आले. कोरेगाव भीमा येथे आले असता अप्पर जिल्हाधिका-यांचा आदेश आल्याने त्यांनी आपली गाडी वाहन पुन्हा वळवली असता, सदरची गाडी सुद्धा तहसीलदारांच्या गाडी मागे येऊ लागली.

सणसवाडी येथे तहसीलदारांनी गाडी पेट्रोलपंपामध्ये वळविली असता ती गाडी देखील तेथे आली. त्यानंतर गाडीत कोण आहे हे पाहण्यासाठी उतरले असता त्या वाहनाने पळ काढला. सदर गाडीत दोन व्यक्ती बसल्या असल्याचे तक्रारी म्हटले असून ही गाडी वाळू माफीयांची असुन अनधिकृत वाळू वाहतूक करणे शक्य व्हावे यासाठीच माझ्यावर पाळत ठेवत असल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले की, कुणाही शासकीय कर्मचारी-अधिकारी यांचे बाबतीत असा प्रकार होणे गंभीर असून आपण भोसले यांच्या तक्रारीवरुन प्रादेशिक परिवहन मंडळाकडे (आरटीओ) वर नमूद केलेल्या वाहन नंबरवरुन माहिती मागविली असून प्राथमिक तपासानुसार सदर गाडी पारनेर (जि.नगर) येथील अभय औटी यांची असल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यानुसार रविवारी या गाडीत असलेला चालक, त्यातील इतर व्यक्ती आणि त्यांचे पाठलागाचे उद्देश स्पष्ट करण्यासाठी चालकाला तातडीने ताब्यात घेतले जाईल व धडक कारवाई केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.