Pune News : धक्कादायक ! इव्हेंटसाठी मृत कोविड योद्धा़ंचे चेक वितरण रोखले

एमपीसी न्यूज : कोरोना महामारीच्या काळात जीव गमावलेल्या 44 मृत कोरोना योद्ध्यांच्या कुुटुंबियांना आर्थिक मदतीचे चेक वितरणाचा इव्हेंट सत्ताधारी पक्षाला करायचा आहे. त्यासाठी पीडित कुटुंबियांना चेक वितरण रोखून धरल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

कोरोना महामारीच्या काळात सेवा देताना 50 हून अधिक महापालिकेचे कर्मचारी कोरोनाचा संसर्ग होऊन दगावले होते. यातील बहुतांश कर्मचारी कायमस्वरुपी तर अन्य कंत्राटी तत्त्वावर सेवेत होते.

घरातील कमविते पुरूष आणि महिला कोविड योद्धे मृत्यूमुखी पडल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या दु:खावर फुंकर घालून दिलासा देण्यासाठी कायम कर्मचा-यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपये तसेच कुुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता.

त्यानुसार सर्व समित्या आणि प्रशासकीय मान्यतेनंतर महापालिका प्रशासनाकडून पहिल्या टप्प्यात तीन महिन्यांपुर्वी 15 चेक स्वाक्षरी करून तयार केले आहेत. परंतु, पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपा आणि मित्रपक्षांना चेक वितरणाचा मोठा इव्हेंट करून गाजावाजा करायचे नियोजित आहे.

त्यासाठी राज्यपातळीवरील नेत्यांच्या तारखा, वेळा निश्चित होत नसल्यामुळे मयत कर्मचा-यांच्या कुटुंबियांना चेक वितरण न करण्याचे आदेश दिले गेले आहेत.

दरम्यान या चेकची मुदत देखील लवकरच संपुष्टात येणार असल्यामुळे मुळातच विलंबाने घोषित केलेल्या मदतकार्याला ब्रेक लागला असून महापालिका प्रशासनाला पुन्हा नव्याने चेक काढण्याची नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे.

राजकीय चमकोगिरीसाठी मयत कोविड योद्ध्यांच्या कुटुंबियांना ओलीस धरल्यामुळे नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.