Talegaon Dabhade : दुसऱ्या दक्षिण आशियाई कुंग फू अजिंक्यपद स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाच्या सिया चिमटेला सुवर्णपदक

एमपीसी न्यूज – मडगाव गोवा येथे दुसरी दक्षिण आशियायी कुंगफू अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील इंद्रायणी महाविद्यालयात कला शाखेच्या दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या सिया चिमटे हिने सुवर्णपदक मिळवले. 19 वर्षाखालील 64 किलो वजनी गटात तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिच्या यशाबद्दल विविध स्तरातून तिचे कौतुक होत आहे.
या स्पर्धा दि.7,8,9 जून 2023 रोजी  पार पडल्या.19 वर्षाखालील गटात 64 किलो वजनी गटात सिया चिमटे हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे म्हणाले की, व्यायामाने फक्त शारीरिकच नव्हे तर बौद्धिक, सामाजिक, भावनिक, मानसीक प्रगती होत असते जी आयुष्याच्या विविध टप्प्यांवर माणसाला योग्य निर्णय घेण्यासाठी, कठीण प्रसंग कुशलतेने हाताळण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करत असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती बरोबरच विविध खेळांमध्ये भाग घेऊन खेळामध्ये आपले करिअर घडवावे.
चिमटे हिच्या यशाबद्दल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेशभाई शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे तसेच अन्य संस्था पदाधिकाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले व तिच्या पुढील क्रीडा प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.