Sobat Sakhichi : सोबत सखीची… मासिक पाळीच्या तक्रारी आणि कारणे

एमपीसी न्यूज – नामवंत स्त्रीरोगतज्ञ व आहारतज्ज्ञ डॉ. गौरी गणपत्ये यांची ‘सोबत सखीची’ ही लेख व व्हिडिओ मालिका आम्ही आपल्यासाठी सादर करीत आहोत. या माध्यमातून आपली सखी – डॉ. गौरी गणपत्ये या आपल्याशी दर आठवड्याला संवाद साधणार आहेत. मासिक पाळीच्या तक्रारीं आणि कारणे या विषयावरील या मालिकेतील हा​ पंधरावा ​भाग…


सोबत सखीची – भाग 15

मासिक पाळीच्या तक्रारी आणि कारणे

अनियमित मासिक पाळीमुळे तुम्ही त्रस्त आहात का ? मासिक पाळीच्या वेळी अंगावर खूप कमी जाणे, किंवा खूप जास्त जाणे, पोटात दुखणे या तुमच्या किंवा तुमच्या परिचित स्त्रियांच्या तक्रारी आहेत का ? तर मग आजचा video शेवटपर्यंत बघा. आणि जर या चॅनेल वर नवे असाल तर चॅनेलला subscribe करायला विसरू नका.

नमस्कार सोबत सखीची या यू ट्यूब चॅनेलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करते. मी आहे आपली सखी डॉ गौरी.

सुरुवातीच्या तिसर्‍या चौथ्या व्हिडिओ मध्ये आपण मासिक पाळी, HPO axis यांची बेसिक माहिती जाणून घेतली.

या विडियो मध्ये आपण मासिक पाळीच्या तक्रारींविषयी माहिती जाणून घेऊ.

मासिक पाळीच्या तक्रारींची कारणं काय हे आधी पाहू .

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, स्ट्रेस आणि anxiety, शारीरिक आजार, काही औषधांचे दुष्परिणाम, घट्ट अंतर्वस्त्र, वयाच्या विशिष्ट अवस्था यांसारख्या अनेक कारणांमुळे मासिक पाळीच्या तक्रारी सुरू होतात.

खरंतर नियमित मासिक पाळी येण हे आरोग्याचं द्योतक आहे, काहीही शारीरिक अडचणी नसल्याचं द्योतक आहे. तरी बर्‍याच जणी मासिक पाळीला प्रॉब्लेम असं का संबोधतात हा एक मोठा प्रश्नच आहे. काही जणी मासिक पाळीच्या छोट्या छोट्या बदलांचा उगाचच बाऊ करत असतात, तर काही जणी मोठी आजारपणं सुद्धा अज्ञानामुळे, डॉक्टरांच्या भीतीमुळे किंवा पैसा खर्च होईल या भीतीने अंगावर काढत असतात.

आज आपण अशी काही लक्षण बघू ज्यांच्यासाठी एकदा तरी डॉक्टरांची भेट घेणं आवश्यक आहे. आणि डॉक्टरांनी सुचवलं तर त्यांच्या सल्ल्याने काही तपासण्या करून घेणं सुद्धा आवश्यक आहे. कारण ही लक्षण बरेचदा कमी स्वरुपात असतील तर नॉर्मल असतात पण जर तीव्र असतील तर त्यासोबत काही आजार असण्याची शक्यता असते.

_MPC_DIR_MPU_II

या तक्रारी म्हणजे
1. अनियमित मासिक पाळी – मासिक पाळीच एक सायकल साधारण २८ ते ३० दिवसांचं असतं.
कित्येकदा सुरुवातीच्या काही सायकल्स मध्ये पाळी अनियमित असते पण जस जस HPO axis च्या वेगवेगळ्या घटकांच एकमेकांशी co ordination जुळायला लागतं तसं 21 ते 35 या दिवसांमध्ये कधीही पाळीचं सायकल त्या त्या स्त्री पुरतं set व्हायला लागतं. हं, आता HPO axis म्हणजे काय हे तुम्ही मागच्या या video मध्ये बघू शकता. मासिक पाळी बंद होण्याचा काळ जवळ आला तरी देखील पाळी खूप अनियमित होते. त्यामुळे कधी 21 दिवसांच्या आधी येण किंवा कधी 35 दिवसांनी देखील पाळी न येणं ही म्हणजे अनियमितता. प्रत्यक्षात काही जणींचे सायकल दीड दीड महिन्यांचं देखील असतं आणि ते त्यांच्यासाठी नॉर्मल देखील असते, पण ते नॉर्मल आहे हे शिक्कामोर्तब करण्यासाठी एकदा तरी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले असते. दोन मासिक पाळींच्या मधल्या काळात ब्लीडींग होणं ही देखील abnormal गोष्ट आहे, त्या मागचं कारण देखील लगेच शोधून त्यावर उपचार करणे गरजेच असतं.

2. दुसरं लक्षण आहे, पाळीचा स्त्राव कमी होणे. खरतर मासिक पाळीचा स्त्राव साधारण 4 ते 5 दिवस होतो आणि जवळ जवळ त्यातला 70 टक्के स्त्राव पहिल्या दोन दिवसातच होतो.प्रत्येक स्त्री नुसार या स्त्रावाची मात्रा प्रत्येकात वेगवेगळी असते आणि ती 20 ml पासून ते 80 ml पर्यंत कितीही असू शकते. पण हे नॉर्मल आहे की abnormal हे एकदा आपल्या डॉक्टरांशी बोलून खात्री करून घेतली पाहिजे कारण यामध्ये कधी कधी obesity, PCOD, thyroid disorders, severe Anemia यासारखी आणि इतरही काही कारणं असण्याची शक्यता असते.

3. मासिक पाळीचा अत्यधिक प्रमाणात स्त्राव होणे – मासिक पाळीच्या सुरुवातीच्या काही सायकल्समध्ये आणि पाळी बंद होण्याच्या काळात म्हणजेच मेनोपॉझ जवळ असतानाच्या काळात मासिक पाळीचा स्त्राव जास्ती होणं हे कॉमन आहे. तरी देखील गर्भाशयाचे काही व्याधी उदाहरणार्थ fibroid, polyp, Endometriosis, कॅन्सर, काही औषध गोळ्यांचे परिणाम, हार्मोनल imbalance, सूट होत नसलेली कॉपर टी या आणि यासारख्या इतरही काही कारणांमध्ये मासिक पाळीचा स्त्राव जास्त प्रमाणात होऊ शकतो. जास्त स्त्राव होऊन शरीरातील हिमोग्लोबिन ची पातळी खाली जाण्याचा आणि त्यामुळे शरीरावर इतर दुष्परिणाम होण्याचा धोका खूप जास्त असतो.

4. मासिक पाळीच्या वेळी पोटात खूप दुखणे – हे ही एक खूप कॉमन लक्षण आहे आणि थोड्या फार प्रमाणात सगळ्यांच्याच पोटात मासिक पाळीच्या वेळी कधी न कधी दुखलेल असत. पण हा प्रकार दर महिन्यात घडत असेल आणि दर महिन्यात दैनंदिन काम सोडून पोटदुखी मुळे सक्तीची विश्रांती घ्यावी लागत असेल, तर एकदा तुमच्या फॅमिली डॉक्टर चा किंवा स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला जरूर घ्या. पाळी अनियमित असेल तर दैनंदिन जीवनात व्यायामाचा अंतर्भाव जरूर करावा. रोज किमान अर्धा ते पाऊण तास व्यायाम केल्याने शरीर active आणि निरोगी रहाते, तसेच मानसिक स्वास्थ्य उत्तम राहून हार्मोनल imbalance कमी व्हायला मदत होते. Aerobics, प्राणायाम यांच्या जोडीला योगासन केल्यामुळे गर्भाशयाचा रक्तपुरवठा सुरळीत व्हायला तसेच HPO axis नॉर्मल व्हायला मदत होते. प्राणायामाचे विविध प्रकार उदाहरणार्थ अनुलोम विलोम, कपालभाती, भ्रामरी यांचा चांगला उपयोग होतो. तसेच सूर्य नमस्कारनेही फायदा होतो. योगासनांमध्ये पाठीवर व पोटावर झोपून करायची सर्व आसने त्यातही विशेषत: धनुरासन, उष्ट्रासन, भुजंगासन, मालासन, बद्धकोनासन यांचा चांगला उपयोग होतो. आहारात मैदा, बेकरीचे पदार्थ, junk food फास्ट फूड, salty फूड पूर्णत: टाळावेत. अतिगोड पदार्थ खाण देखील टाळाव. कोण्ड्यासकट धान्य, वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य, भाज्या, फळं यामधून natural vitamins आणि minerals मिळवण्याचा प्रयत्न करावा. उत्तम प्रतीचे आणि उत्तम मात्रेत प्रोटीन्स युक्त आहार घ्यावा. आहार नेहमी ताजा आणि सकस असावा. त्यातही मासिक पाळीच्या तक्रारी असतील तर आहारामध्ये आलं, हळद, जवस, लसूण, शेपूची भाजी, कोहळा आणि फळांमध्ये आवळा, पपई आणि अननस यांचा समावेश करावा. आयर्न, प्रोटीन व ओमेगा 3 fatty acids, Vitamin बी1, बी 6, vit E, vit D, मॅग्नीशियम, कॅल्शियम, झिंक यांचे source असणाऱ्या घटकांचा आहारात आवर्जून समावेश करावा. आपलं वजन प्रमाणापेक्षा कमी अथवा प्रमाणापेक्षा जास्त असेल तर आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने आहारात योग्य ते बदल करावेत.

मासिक पाळीचा त्रास कोणत्या स्वरूपाचा आहे यावर त्याची ट्रीटमेंट अवलंबून आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात काही औषधं घेऊ नयेत. कारण यामध्ये क्रियात्मक बिघाड झाला असेल तर औषध गोळ्यांमुळे तो नीट होऊ शकतो पण रचनात्मक बिघाड झाला असेल तर त्याला सर्जरीची मदत घ्यावी लागते. वरचेवर मासिक पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या खाऊ नयेत, त्यामुळे हार्मोन्स चा समतोल बिघडतो.

गर्भाशयाचा काही त्रास असण्याची शक्यता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सोनोग्राफी करून निदान करता येतं. इतर काही निदानांसाठी आणखी काही वेगळ्या तपासण्या लागू शकतात, त्यांची माहिती यथायोग्य वेळी आपण घेणारच आहोत, पण पुढच्या भागांमध्ये.

त्याआधी आजचा video आपल्याला कसा वाटला ते मला नक्की सांगा, काही शंका असतील तर खाली कमेन्ट बॉक्स मध्ये पोस्ट करा, मी नक्की उत्तर देईन. पुढच्या आठवड्यात नवीन माहिती सह नक्की भेटू. तो पर्यंत धन्यवाद !

– डॉ. गौरी गणपत्ये

M.S (Ayu) OBGY
P.G.D.Diet

स्त्रीरोगतज्ज्ञ व आहारतज्ज्ञ
मोबाईल: 9423511070
ई-मेल: [email protected]

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1