Special : सर्वसामान्य माणसाचे सुखाचे स्वप्न पूर्ण होईल का ?

(हर्षल विनोद आल्पे)

एमपीसी न्यूज- आज सकाळी वाण्याकडून येताना थांबावं लागलं पेट्रोल भरण्यासाठी ..सहज काट्याकडे लक्ष गेल. पाहतो तर काय ? पेट्रोल 90 रुपये लिटर. जरासा घाबरलोच मी …… मी घाबरलो तसंच माझ पाकीटही घाबरलं असावं ..पाकिटातली 100 ची नोट बाहेर यायला जराशी कुरकुरच करत होती, लवकर हातात येतच नव्हती. सारखी 10 च्या नोटेला पुढे पुढे करत होती. शेवटी तिला नजरेनेच समजावल्यावर एकदाची ती बाहेर आली. अन ती दिल्यावर पंपावर असलेली 10 ची नोट माझ्या पाकिटात येऊन बसली. ती नोट जरा मला चिडवुनच दाखवत होती. ती ठेवल्यावर मनात अजून एक भीती निर्माण झाली ती म्हणजे थोड्याच दिवसात या 100 च्या नोटेच्या बदल्यात कदाचित पाकिटात काहीच येणार नाही. तसाच गाडी घेऊन घरी आलो …हताशपणे

काम आटपून पेपर हातात घेतला अन नंतर फेसबुक पाहायला लागलो ..पेपरमध्ये विशेष असं काहीच आढळलं नाही ..फेसबुकवर एका नेत्याचं वक्तव्य वाचायला मिळालं, ते म्हणजे ‘पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्य माणसाला काहीही फरक पडत नाही’. ते वाचून मी स्वतःला आरशात पाहायला लागलो, अरेच्चा, आपण सामान्य नाही वाटत ..आजपर्यंत आपण उगाचच स्वतःला सामान्य समजत होतो. हे सगळं विसरण्यासाठी टीव्ही लावला. म्हटलं, यात काहीतरी सुखावह बातमी असेल. पण तेवढ्यात एका केंद्रीय मंत्र्याची पत्रकार परिषद सुरु झाली .तो नेता म्हणत होता की ‘ पेट्रोल डिझेलच्या भावावर सरकार नियंत्रण ठेवू शकत नाही’ ते ऐकून आणखीनच बुचकळ्यात पडलो. आजवर माझा असाच समज होता की या सगळ्यावर सरकारच नियंत्रण ठेवू शकते. या मुळेच तर त्या अपेक्षेने आपण मतदानाला उत्साहाने जातो. की चांगले सरकार निवडू जे आपल्याला सुखसमृद्धीने जगायला मदत करेल. पण नेत्याचे हे वक्तव्य ऐकून अजूनच नकारात्मक वाटायला लागलं. माफ करा, पण इथे होकारात्मक कस राहायचं कळत नाहीये. काय करणार, कदाचित मी सामान्य नसेन ना ! पण अहो असं म्हणतात ना, की पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळेच तर महागाई वाढते. भाज्यांचे भाव त्यामुळेच कडाडतात ना ? असं माझ्या कानावर आलं होतं. कदाचित ते खरं नसेलही

विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष खरतर मी या दोघांमध्येही येत नाही. मी दोघांनाही मतदान केलंय आलटून पालटून एका अपेक्षेने की कुणीतरी सुखाचे दिवस देईल. पण हे दोघे एकमेकांची उणीदुणी काढण्यातच धन्यता मानत असतील तर एक मतदार म्हणून मी कोणाकडे पाहायचं ?

भाऊ ! मला हुकूमशाही झेपणार नाही. मला लोकशाहीच परवडते. तोच माझा वर्तमान आहे अन तेच माझे भविष्य आहे. अशावेळी मी कुठे जायचं ? 2019 च्या निवडणुकीआधी हे चित्र पालटेल अशी रोज आशा करतो. ती आशा पूर्ण होण्याच्या अपेक्षेने एक एक दिवस पुढे जातोय ….महागाई रोज वाढतीये….. ..माझा पाकीट रिकामं होत चाललय…… येणारे पैसे अन जाणारे पैसे याचं गणित बिघडतंय. मी गणितात कच्चा होतो पण गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळवणारा मित्र परवा भेटला. तो सुद्धा हेच म्हणाला की, गणित बिघडतंय. बाकीच्या देशात कितपत महागाई आहे माहीत नाही आणि माहित करून घेऊनही तसा फरक पडणारच नाहीये ..फक्त राजकीय वादविवाद मेळावे जिंकायला त्याचा उपयोग होत असेल. ते पण मला झेपत नाहीये .कारण त्या देशांमध्ये स्वस्ताई आली तरी माझं पाकीट थोडीच फुगणार आहे ?

जाऊ दे, मला एक स्वप्न पडतंय ते मात्र चांगलंय की आताच सरकार किंवा उद्याच सरकार या पेचातून मस्तपैकी मार्ग काढेल अन माझा पाकीटही सशक्त होईल. अन पुढची पिढी मला दुवा देईल की मी त्या सगळ्याचा भाग असल्याबद्दल. सगळीकडे आनंदी-आनंद सगळीकडे नांदेल. देशातील कोणीही दुःखी नसेल. कदाचित 1 जानेवारी 2020 चा सूर्य हसत हसत येईल अन समाधानाने अस्ताला जाईल अन दुसऱ्या दिवशी पुन्हा आनंद पाहायला येईल. कलाम काकांचं ते स्वप्न आपण पूर्ण करायलाच हवं. आपण जात धर्म वैगरे सोडून या वाढत्या महागाई विरुद्ध युद्ध छेडूया ना ! स्वस्ताईसाठी आरक्षण मागायला हरकत कोणाचीच नसावी ! आता प्रगतीलाच आरक्षण मंजूर करूया …

‘हेचि स्वप्न अन हेचि मागणे तुम्हाला

करितो मी पामर सरकार तुम्हाला

न्याय द्या आज आम्हाला’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.