Moshi News :  टोल वसुली तात्काळ बंद करा  – मोढवे

एमपीसी न्यूज – पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे पथकर वसुली टोलनाका पुन्हा सुरू करण्यात आला असून, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून टोल वसुली केली जात आहे. मात्र, यामुळे वाहनचालकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. (Moshi News) त्यामुळे सदर टोल वसुली तात्काळ बंद करावी, अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.

याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाला निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, राजगुरूनगर, चाकण आणि नाशिक फाटा या पट्टयात नियमित वाहतूक कोंडीने वाहन चालक त्रस्त आहेत. रस्ता रुंदीकरणाचे काम अपूर्ण असल्यामुळे नागरिकांना तासंतास वाहतूक समस्येचा सामना करावा लागतो. त्याच टोलनाक्‍यांवरील रांगांमुळे मोशीतून अवघ्या सहा सात किलोमीटर असलेल्या चाकणला किंवा चार किलोमीटरवर असलेल्या भोसरी, नाशिक फाट्याला जाण्यासाठी अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागतो. टोल नाका बंद झाल्याने मध्यंतरी काही काळ वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र,  5 जानेवारी 2023 पासून पुन्हा टोलवसुली केली जात आहे.

Nigdi News : पोलीस रेझिंग डे निमित्त दिशा उपक्रमाअंतर्गत झोपडपट्टी भागातील बालकांचा गौरव

वास्तविक, टोलनाक्यामुळे अनेक गावांना त्याचा फटका बसणार असून नागरिकांवर आर्थिक बोजा पडणार आहे. तसेच, या टोलची मुदत 8ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 12 नंतर समाप्त झाली होती. (Moshi News) त्यामुळे मेसर्स ए टी आर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडला (आयआरबी) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पथकर वसुली बंद करण्याचा आदेश दिला होता. आता पुन्हा नव्याने गुरुवार (दि.5 )पासून टोलवसुली सुरू करण्यात येणार आहे, ही बाब अन्यायकारक आहे, असेही मोढवे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.