Bahubali In Marathi : सुपरहिट बाहुबली आता मराठीत ! अमोल कोल्हे, सोनाली कुलकर्णी यांचा आवाज, प्रविण तरडे यांचे दिग्दर्शन

एमपीसी न्यूज – सुपरहिट बाहुबली आता मराठीत येतोय. मुळ चित्रपटाच्या तोडीस तोड भव्यता जपत सादर करण्यात आलेला या मराठी ‘बाहुबली’ चित्रपटाचे प्रक्षेपण दिवाळीच्या मुहुर्तावर म्हणजे गुरूवारी (दि.04) दुपारी 12 आणि सायंकाळी 7 वा. ‘शेमारू मराठीबाणा वाहिनी’वर करण्यात येणार आहे. चित्रपटसृष्टीतील दिग्गज मंडळीसाठी नुकतेच पुण्यात या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन केले होते.

चित्रपटाच्या डबिंगसाठी 120 हून अधिक कलाकारांचा सहभाग होता. चित्रपटाचे डबिंग अचूक व्हावे यासाठी कलाकारांच्या निवडीपासून ते त्यांच्या आवाजाच्या चाचणीपर्यंत प्रत्येक कलाकाराला कठोर निकषातून जावे लागले. अभिनेते डॉ.अमोल कोल्हे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी, उदय सबनीस, संस्कृती बालगुडे, मेघना एरंडे यांनी मराठी बाहुबलीसाठी आपला आवाज दिला आहे. याच्या कलात्मक दिग्दर्शनाची जबाबदारी अभिनेते–दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी तर लिखाणाची जबाबदारी स्नेहल तरडे यांनी सांभाळली आहे.

संगीताची जबाबदारी कौशल इनामदार यांना सोपवली तर गीतलेखनाची जबाबदारी वैभव जोशी, मिलिंद जोशी, अस्मिता पांडे यांनी सांभाळली. यातील गाण्यांना आदर्श शिंदे, बेला शेंडे, अवधूत गुप्ते, संजीव चिम्मलगी, हृषिकेश रानडे, हंसिका अय्यर, बेला शेंडे, केतकी माटेगावकर, मुग्धा कऱ्हाडे या गायकांचा स्वरसाज लाभला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.