Bopkhel News : मुळा नदीवरील उड्डाणपुलासाठी 502 झाडांच्या होणा-या कत्तलीला पर्यावरण प्रेमींचा विरोध

आदित्य ठाकरेंना लक्ष घालण्याची विनंती

एमपीसी न्यूज – बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवरील उड्डाणपुलाच्या कामाला संरक्षण विभागाची ‘वर्किंग’ परवानगी मिळाली आहे. या पुलामुळे 35 हजार बोपखेलवासीयांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. पण, या पुलासाठी तब्बल 502 झाडांची कत्तल केली जाणार असल्याचा दावा पर्यावरण प्रेमींनी केला आहे. त्यामुळे या वृक्ष तोडीला विरोध होत आहे. याबाबत महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्ष घालण्याची विनंती पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

उड्डानपुलाच्या निमित्ताने तोडल्याजाणा-या झाडांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने पुनर्रोपण केले जावे अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

‘या भागात 502 पूर्ण वाढलेली झाडे आहेत, त्यात अनेक मूळ प्रजाती आहेत, जी पर्यावरणासाठी विशेषत: मुळा नदीच्या रिपेरियन झोनसाठी खूप महत्त्वाची आहेत. या झाडांची कत्तल करण्यापेक्षा खडकीजवळील मुळा नदीच्या काठावर आणि पिंपरी जवळ पवना नदीच्या काठावर वृक्षांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने पुनर्रोपण केले जाऊ शकते. या बाबत आदित्य ठाकरे यांनी लक्ष घालून झाडांचे पुनर्रोपण करण्याची सूचना पालिकेला द्यावी,’ अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी आपल्या निवेदनात केली आहे.

‘पर्यावरण संरक्षणाच्या दुष्टीकोणातून या झाडांची कत्तल न करता पुनर्रोपण करणे आवश्यक आहे. पुनर्रोपणाचा सक्सेस रेट कमी आहे, त्यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करावा व ही झाडे वाचवली जावीत’ अशी आमची मागणी आहे. असे औंध विकास मंडळाच्या अध्यक्षा वैशाली पाटकर म्हणाल्या.

एरिया सभा असोसिएशन ऑफ पुणेच्या स्वप्ना नारायण म्हणाल्या, ‘पूर्णपणे वाढ झालेल्या 502 झाडांची कत्तल न करता मुळा आणि पवना नदीच्या काठावर त्यांचे पुनर्रोपण करावे. स्थानिक नागरिक आणि या क्षेत्रातील तज्ञ लोकांची देखील मतं पालिका आणि संरक्षण विभागाने ऐकूण घ्यावीत.’

दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मार्फत बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवर बोपखेल वासीयांसाठी बांधण्यात येणा-या पुलाचे 4 जानेवारी 2019 मध्ये काम सुरू झाले. नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले. परंतु, संरक्षण विभागाच्या जागेवरील काम बाकी होते. ते काम चालू करण्यासाठी संरक्षण विभागाची परवानगी आवश्यक होती. 9 सप्टेंबर रोजी संरक्षण विभागाच्या जागेवरील काम करण्यासाठीची अंतिम (वर्किंग) परवानगी मिळाली. त्यामुळे संरक्षण विभागाच्या जागेवरील पुलाचे काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.