Talegaon Dabhade : रशियन सैन्यच लढले नाही, तर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा आरडाओरडा काय कामाचा?

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी गुंफले स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प

एमपीसी न्यूज – आज युक्रेनचे नागरिक व सैन्य ‘गनिमी कावा करीत रशियाला प्रतिआव्हान देत आहेत, ही मोठी जमेची बाजू आहे. रशियाचे रणगाडे 100-200 किलोमीटर परिसरात पसरले आहेत. त्यांच्यावर युक्रेनचे सैनिक रॉकेट लाँचरच्या साहाय्याने आक्रमणे करून त्यांचा घात करत आहेत. रशियन सैन्यही लढण्याच्या मनस्थितीत नाही. सैन्यच लढले नाही, तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी कितीही आरडाओरडा केला, तरी काहीही फरक पडणार नाही, असे प्रतिपादन (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले.

मावळभूषण मामासाहेब खांडगे सभागृहात श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्तपणे आयोजित स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे विनायक अभ्यंकर, संस्थापक संतोष खांडगे, सोनबा गोपाळे, महेशभाई शहा, अध्यक्ष सुमती निलवे, बाळासाहेब शिंदे, ॲड मच्छिंद्र घोजगे, मिलिंद शेलार, सुनिल कोल्लम, विलास भेगडे, पांडुरंग पोटे, विल्सेन्ट सालेर, सचिन कोळवणकर, दशरथ जांभुळकर, युवराज पोटे, सुवर्णा मते, हिरामण बोत्रे, विलास टकले यांच्यासह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेमंत महाजन पुढे बोलताना म्हणाले, की रशियाची वाहने शहराच्या आत आलेली आहेत. त्यांच्यावर युक्रेनचे सैनिक रॉकेट लाँचरच्या साहाय्याने रात्रीची वेळ साधून किंवा सकाळच्या वेळी अचानकपणे आक्रमण करत आहेत. त्यामुळे रशियाच्या सैन्याचा पुढे जाण्याचा वेग अतिशय मंदावला आहे. रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध झाल्यास युक्रेनला सहकार्याची भाषा करणारे देश प्रत्यक्षात सैन्य पाठवण्यास तयार नाहीत. नाटोमध्ये युद्ध लढण्याची हिंमतच नाही. युक्रेनच्या नागरिकांनी दाखवलेले धैर्य भारतीयांनी धडा घेण्याजोगे आहे. तिथल्या शहरांचे महापौर युध्दाचं नेतृत्व करीत आहेत, हे कौतुकास्पद आहे.

भारताला सात हजार किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असल्याने शत्रूंना भारताची नाकाबंदी करणे अवघड होणार आहे. चीनशी मुकाबला करताना भारताला पाकिस्तानाचाही सामना करावा लागणार आहे. त्यामुळे भारताने स्वत:ची सैन्यक्षमता आणि युद्ध सामुग्रीचे आधुनिकीकरण यावर भर द्यायला हवा.

भारताने चीन आणि पाकिस्तानला स्पष्ट सांगितले पाहिजे, की आमच्याशी व्यापार वाढवायचा असेल, तर भारताच्या सीमा मान्य कराव्या लागतील. अफू गांजाचा दहशतवाद शहरांपर्यंत पोहोचला आहे. एकट्या पंजाबमधील 40 टक्के तरुणाई व्यसनाच्या आहारी गेली आहे. हे नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान आप सरकारपुढे असणार आहे. काश्मीरमधील आतंकवादी कारवाया, पाकिस्तान व बांगलादेशी घुसखोरी, नार्को टेरिरिझम आदींच्या विरोधात कारवाई करून त्यांचे कंबरडे मोडले पाहिजे, असेही महाजन यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब शिंदे यांनी, सूत्रसंचालन कुसुम वाळुंज व लक्ष्मण मखर यांनी, तर  पांडुरंग पोटे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.