Pimpri : कचरा व्यवस्थापणाचा बोजवारा उडण्यासाठी कारणीभूत अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई करा

जागृत नागरिक महासंघाची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचऱ्याचे ढीग साचले आहेत.  या कचरा कोंडीला कारणीभूत असलेल्या अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी जागृत नागरिक महासंघाने केली आहे. 

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, आरोग्य अधिकारी डॉ. के.अनिल रॉय यांना निवेदन देण्यात आले आहे. अध्यक्ष नितीन यादव, सहसचिव उमेश सणस यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य विभागाने 1 जुलैपासून मोठा गाजावाजा करत नवीन कंत्राटदारांमार्फत कचरा संकलन सुरु केले. नगरसेवकांनी कचरा गाड्यांचे पूजन करत ‘फोटोसेशन’ केले. प्रत्यक्षात मात्र कचरा संकलनाचा बोजवारा उडला आहे. शहरात ठिकठिकाणी कच-याचे ढिग साचले आहेत.

शहरातील कोणत्याही सोसायटीमध्ये कचरा दिसनार नाही अशी ग्वाही महापालिका अधिका-यांनी दिली.  “स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने” “देशसे ये वादा कर लिया हमने” ही बहुचर्चित ट्यागलाईन गाडीवरील भोंग्यातून जोरजोरात वाजवत कचरा गाड्या आपापल्या भागात मार्गस्थ झाल्या. मात्र दोनच दिवसात ठेकेदाराने त्याचे खरे रूप दाखवायला सुरुवात केली. ठेकेदारांचे कामावर लक्ष ठेवण्याची त्याच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी महापालिकेच्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर आहे.

दोन दिवस एकदाही ठेकेदाराच्या त्या चकाचक कचरा गाडीने तानाजीनगरच्या बऱ्याच भागात साधे दर्शनही दिले नाही. त्यामुळे अनेक सोसायट्याच्या प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याच्या बकेट भरून वाहत असल्याचे दृष्य पहावयास मिळत आहे. एलप्रो चौकात आणि रामकृष्ण मोरे सभागृहासमोर कचरा कुंड्या भरून कचरा रस्त्यावर वाहताना दिसून येत आहे.

यामध्ये महापालिका आरोग्य अधिकारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणा दिसत आहे.  शहरातील कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडण्याला कारणीभूत ठरलेल्या प्रत्येक बाबींची तात्काळ चौकशी करावी. दोषींवर व ठेकेदारांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.