Pimpri : सोने घ्या, सोन्यासारखे राहा… म्हणत शहरात दसरा उत्साहात साजरा

एमपीसी  न्यूज –  दाराला लावलेले झेंडू व आंब्याच्या पानांचे तोरण…सकाळपासूनच घर, कार्यालय, कंपन्यांमध्ये वस्तू, मशिनरी, वाहने स्वच्छ धुऊन त्यांच्या पूजनासाठी चाललेली लगबग…दुपारी काहीशी विश्रांती घेऊन सायंकाळी पुन्हा मित्र, आप्तेष्टांकडे जाऊन त्यांना आपट्याची पाने देत “सोने घ्या, सोन्यासारखे राहा’ असा आशीर्वाद घेण्यासाठी धडपड करणारी बच्चे कंपनी, तर रात्री ठिकठिकाणी फटाक्‍यांच्या आताषबाजीमध्ये रावण दहनासाठी झालेली गर्दी, अशा आनंदोत्सवी वातावरणात  गुरुवारी दसरा शहरात साजरा झाला.

सकाळपासूनच प्रत्येक घरी नव्या-जुन्या वस्तू, वाहने धुण्यासाठीची लगबग सुरू होती. त्यानंतर आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांपासून बनविलेले तोरण घराच्या दाराला लावण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यानंतर घरातील नव्या-जुन्या, छोट्या-मोठ्या वस्तू आणि दारासमोर लावलेल्या वाहनांना हार घालून त्यांची पूजा करण्यात आली. नवीन वाहने, वस्तूंचीही विधिवत पूजा करून एकमेकांना पेढे, मिठाई भरवत असल्याचे होते.
सकाळची लगबग दुपारी काही प्रमाणात कमी झाली. त्यानंतर गोडधोड जेवणाचा आस्वाद घेत काही वेळ आराम करण्यावर नागरिकांनी भर दिला. त्यानंतर सायंकाळी आपले कुटुंबीय, शेजारी आणि मित्र-मैत्रिणींच्या घरी जाऊन आपट्याची पाने एकमेकांना देऊन नागरिक एकमेकांना शुभेच्छा देत होते. लहानग्यांच्या आग्रहामुळे जवळच्याच मैदानातील रावण दहनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.