Pimpri News: शहरातील अतिक्रमणांवर कठोर कारवाई करा; महापौरांचे प्रशासनाला आदेश

एमपीसी न्यूज – शहरातील वाढते अतिक्रमण, अवैध धंदे, बेशिस्त वाहतुक याबाबत दिवसेंदिवस तक्रारी वाढत आहेत.  त्यामुळे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मोहिम राबवून याबाबत कठोर कारवाई करावी, असे आदेश महापौर उषा ढोरे यांनी प्रशासनाला दिले. हॉकर्सचा प्रश्न सोडविण्यासाठी नियोजनबध्द हॉकर्स धोरण तयार करुन त्याची अंमलबजावणी करावी असेही त्या म्हणाल्या.

कासारवाडी येथील ह क्षेत्रीय कार्यालय येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय सभागृहामध्ये महापौर उषा  ढोरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रभाग क्र 32 मधील कोविड 19 उपाययोजना आणि अतिक्रमणा बाबत सर्वंकष चर्चा करण्यात आली. या बैठकीत  महापौर ढोरे यांनी प्रशासनाला विविध सूचना केल्या.

नगरसदस्या शारदा सोनवणे, क्षेत्रीय अधिकारी अभिजीत  हराळे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, डॉ. किशोरकुमार हांडे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी पंकज मुथ्था, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा भंडलकर, महापालिका कर्मचारी उल्हास देवचक्के, डी. एस. मुंढे, जे. एच. निरगुडे आदी उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, पिंपरी-चिंचवड शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरु आहे.  नागरिकांना राहण्यासाठी उत्तम शहर म्हणून नागरिक या शहराला प्राधान्य देतात.  अशा परिस्थितीत शहराचे सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी शहरवासीय योगदान देत आहेत.

मात्र काही नागरिक, विशेषत: हॉकर्स नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीत.  महापालिका विकास प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन प्रकल्प राबविते, मात्र वाढत्या अतिक्रमणांमुळे रस्त्यांसह महत्त्वाच्या चौकांचे विद्रुपीकरण होत आहे. आपले शहर बकाल दिसू नये याबाबत प्रत्येकाने दक्षता घेतल्यास सर्वांसाठी ते उपयुक्त ठरेल.

शहरातील थांब्यांवर व्यवस्थितपणे रिक्षा नीटपणे उभ्या केल्या जात नाहीत,  फिरते पथारीवाले आपल्या वाहनांवर मोठ्या आवाजातील ध्वनीक्षेपक लावतात, पदपथावरील अतिक्रमण, रस्त्यांवर अतिक्रमणांमुळे होणारी वाहतुक कोंडी आदी तक्रारी सातत्याने येत आहेत.

या समस्येकडे लक्ष देऊन प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी असे महापौर माई ढोरे यांनी प्रशासनास सांगितले.  वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा ठिकाणी हॉकर्सचे नियोजन प्रशासनाने करावे असेही त्या म्हणाल्या.

लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सोयीस्कर ठिकाणी कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र संख्येत  वाढ करावी.  कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे दिसून आले आहे.  त्यामुळे शासनाने निर्धारीत केलेल्या शहरातील प्रत्येक व्यक्तीने कोविड लसीकरण करुन घ्यावे.   शहरातील सुपर स्प्रेडर्स       असणा-या व्यक्तींनी कोविड चाचणी दर 15 दिवसांनी करून घ्यावी, असे आवाहन  महापौर ढोरे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.