BNR-HDR-TOP-Mobile

TalegaDabhade : पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जोमाने काम करा – विजय कोलते

एमपीसी न्यूज – ‘पक्ष संघटना मजबूत असल्याशिवाय मतदारांचे मतपरिवर्तन होत नाही. घड्याळाचे चिन्ह आणि मत मिळविण्याची खूणगाठ मनाशी बांधून काम करा. आपण विधानसभेची निवडणूक निश्चित जिंकू असा विश्वास मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक विजय कोलते यांनी व्यक्त केला.

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाच्या स्थापनेच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त तळेगाव जनरल हाॅस्पिटलच्या रिक्रिएशन हॉलमध्ये आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कोलते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे होते. यावेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष विठठल शिंदे, तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश काकडे, देहूरोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अॅड कृष्णा दाभोळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंटक अध्यक्ष विजय काळोखे, तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष सुनिता काळोखे,जिल्हा परिषद सदस्या शोभाताई कदम, तळेगाव शहर व सुधारणा समितीचे गटनेते किशोर भेगडे, नगरसेवक संतोष भेगडे, आनंद भेगडे, अरूण माने, नगरसेविका वैशाली दाभाडे, मंगलताई भेगडे, तालुका महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, कैलास गायकवाड, संतोष मु-हे, सुनील भोंगाडे, सुदाम कदम, अशोक घारे, सुदर्शन खांडगे, आशिष खांडगे, नगरसेवक राजेंद्र कुडे, विशाल वहिले, अफताब सय्यद सह आजी माजी नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोलते म्हणाले की , आमदारकी आली म्हणजे इतर संस्था देखील ताब्यात येतात. इतर कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळते. पक्ष संघटना मजबूत असल्याशिवाय मतदारांचे मतपरिवर्तन होत नाही. घड्याळाचे चिन्ह आणि मत मिळविण्याची खूणगाठ मनाशी बांधून काम करा. काही प्रमुख पदाधिकारी सभेला गैरहजर राहतात ही बाब संघटनेला पोषक नसल्याची खंत देखील कोलते यांनी व्यक्त केली.

बापूसाहेब भेगडे म्हणाले,” निवडणुकीत व्यक्ती हरत नाही. पक्ष हरतो. कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. पुन्हा उमेदीने काम करून पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे”

यावेळी सुनील भोंगाडे, दत्तात्रय पडवळ, चंद्रजीत वाघमारे, राजेंद्र कुडे, नारायण ठाकर, विठ्ठलराव शिंदे, भाऊसाहेब गायकवाड, बापूसाहेब भेगडे, सुरेश चौधरी, नंदकुमार कोतुळकर, महादुबुवा कालेकर, शोभाताई कदम, सुवर्णा राउत आदींनी पक्ष संघटना, लोकसभेत झालेला पराभव,नेत्यामधील नसलेली एकसूत्रता आदि प्रश्नावर परखड मते मांडली. अनेकांनी आपल्या भाषणात विधानसभेचा उमेदवार अगोदर घोषित करावा अशी सूचना केली. तर स्थानिक स्वराज्य संस्थेवर उमेदवारी देताना निष्ठवंतांना डावलले जात असल्याचा आरोप नवलाख उंबरेचे सरपंच दत्तात्रय पडवळ यांनी केला.

सहकार, शेती, ग्रामीण विषय सोडून राष्ट्रवादी शहरी मुद्यांवर कमी पडली. त्यामुळे सर्वसामान्य मतदार पक्षापासून दुरावला. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा 60 टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त वर्ग होता, असे मत उपस्थित अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. खुर्चीचा, पदाचा, सत्तेचा वापर काही पदाधिकारी नेत्यांनी स्वतःसाठी करून घेतला. त्यामुळे पक्षाची नाहक बदनामी झाली. त्याकडे डोळेझाक झाल्याने पक्षाची पीछेहाट झाली अशी खंत अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

टाकवे – वडेश्वर गटातून पार्थ पवार यांना मताधिक्य मिळाले असून यापुढेही जोमाने कार्यरत राहू असे आश्वासन जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम यांनी दिले. यावेळी आयुब सिकिलकर आणि गोरख बांगर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्वागत, प्रस्ताविक बबनराव भेगडे यांनी केले. आभार गणेश काकडे यांनी मानले.

.