Talegaon : सामाजिक संस्थेच्या मध्यस्थीने 15 वेठबिगारांची सुटका

एमपीसी न्यूज – एका गो-शाळेत पगाराविना काम करणा-या 15 कामगारांची मावळ तहसीलदारांनी सुटका केली. यासाठी इंटरनॅशनल जस्टीस मिशन या संस्थेने मध्यस्थी केली. याप्रकरणी कामगारांना कामाला ठेवणा-यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमंत मारुती गराडे (वय 41, रा. धामणे, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बजरंग किसनराव मेकाले (वय 49, रा. कात्रज-कोंढवा रोड, पुणे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील धामणे येथे संत तुकाराम गोशाळा आहे. आरोपी हनुमंत याने या गोशाळेत 2011 साली 30 लोकांना साडेबारा लाख रुपये देऊन कामाला ठेवले. एक वर्षानंतर त्यातील 15 कामगार काम सोडून निघून गेले. राहिलेल्या 15 कामगारांना आरोपी हनुमंत काम सांगत असे. कामगारांना दर महिन्याला रेशन पुरवठा केला जात होता. यातून त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय होत होती.

मात्र, आरोपी हनुमंत कामगारांना कोणत्याही प्रकारचे वेतन देत नव्हता. त्यामुळे कामगारांनी इंटरनॅशनल जस्टीस मिशन या संस्थेकडे याबाबत तक्रार केली. संस्थेने याप्रकरणी जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली. त्यानंतर, संस्थेचे सदस्य, पुण्याचे कामगार उप आयुक्त आणि मावळचे तहसीलदार यांनी गोशाळेत जाऊन प्रत्यक्ष भेट दिली.

कामगारांशी चर्चा केली असता कामगारांना या ठिकाणी त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मावळ तहसीलदार यांनी कामगारांनी सुटका केली. याबाबत कामगारांना काम सांगणा-यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.