Talegaon : तळेगाव दाभाडे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी

एमपीसी न्यूज – तळेगाव मध्ये शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश मानव अधिकार जागतिक जनजागर समितीचे सचिव प्रदीप नाईक, बालकल्याण समितीच्या उपसभापती प्राची हेंद्रे, आशुतोष हेंद्रे आदींनी त्याबाबतचे निवेदन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव आवारे यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात त्यांच्या कर्तृत्वाचा आदर्श घेतला जातो. तळेगाव दाभाडे शहरात महाराजांचा एकही अश्वारूढ भव्य पुतळा नाही. त्यांच्या नेत्रदीपक कर्तृत्वाचा ठसा जनमानसात रुजविण्यासाठी, तसेच त्यांचे शौर्याने वेळोवेळी समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी हा अश्वारूढ पुतळा प्रेरणा देईल.

याबाबत बोलताना मुख्याधिकारी वैभव आवारे म्हणाले की, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने या मागणीचा लवकरात लवकर पाठपुरावा करण्यात येईल. नागरिकांच्या मागणीचा सकारात्मकतेने विचार करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यासाठी नागरिकांनी योग्य जागा सुचवून सहकार्य करावे, असे आवाहन देखील आवारे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.