Talegaon Dabhade : पारंपरिक वाद्यांच्या गजरात अन् भावपूर्ण वातावरणात ‘बाप्पा’ला निरोप

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे रविवारी सातव्या दिवशी भावपूर्ण वातावरणात विसर्जन मिरवणुकीने सात दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता झाली. बँडपथक आणि ढोल-ताशांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक निघाली. साडेसात तास मिरवणूक चालली. उत्साहपूर्ण वातावरणात मानाच्या सर्व गणेशोत्सव मंडळांनी डीजे वाद्य आणि गुलालविरहित मिरवणूक काढून एक आदर्श निर्माण केला. पावसाच्या सरी बरसत असतानाही कार्यकर्त्यांनी त्याची तमा न बाळगता आपल्या लाडक्या बाप्पाची उत्साहाच्या वातावरणात मिरवणूक काढली.

मानाचा पहिला गणपती ग्रामदैवत श्री.डोळसनाथ तालीम मंडळाच्या गणपतीची आरती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या हस्ते झाली.यावेळी मंडळाचे अध्यक्ष योगेश शामराव भेगडे, नगरसेविका शोभा भेगडे, विश्वस्त अरुण भेगडे,विनोद(बंटी)भेगडे,बाळासाहेब पानसरे यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

सायंकाळी सहा वाजता मुख्य विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी मानाचा श्री.डोळसनाथ तालीम मंडळाचा गणपती आकर्षक रथात विराजमान झालेला होता. मिरवणुकीत मंडळाचे स्वतःचे ढोलपथक सहभागी झाले होते. या मिरवणुकीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दर्शनासाठी नागरीकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.

मानाचा दुसरा गणपती कालिका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आकर्षक सजावट केलेल्या रथात गणपती विराजमान झाला होता. मिरवणुकीत मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभुळकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीत ढोल लेझीम पथक होते. मानाचा तिसरा गणपती तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मानाचा चौथा गणपती राजेंद्र चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आकर्षक फुलांची सजावट केली होती. गणपती चौकातील मानाचा पाचवा गणपती श्री गणेश तरुण मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई केली होती.मंडळाचे स्वतःचे ढोल – लेझीम पथक आहे.कलाकाराने अनेक डाव सादर केले.या मंडळाच्या वतीने वर्षभर उपक्रम राबविले जातात.

सर्वात शेवटी मानाचा भेगडे तालीम मंडळाचा गणपती आकर्षक रथात विराजमान झाला होता.मंडळापुढे ध्वजपथक आणि ढोलपथक होते.कार्यकर्ते मोठया संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.मुख्य मिरवणुकीत अनेक मंडळे सहभागी झाली होती. बहुतेक मंडळांनी फुलांची आकर्षक सजावट केली होती. रोषणाईने सजविलेले रथ,बँड,ढोल लेझीम पथक, विद्युत रोषणाईने विसर्जन मार्ग उजळून गेला होता. काही मंडळांनी स्वतंत्र मिरवणूक काढून गणपतीचे विसर्जन केले.
.
डाळ आळी येथील जय बजरंग प्रतिष्ठानच्या वतीने मंडळांचे स्वागत करण्यात आले तसेच कार्यकर्त्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.विवेकानंद मित्र मंडळानेही गणेश मंडळांचे स्वागत केले.

शाळा चौकात नगरपरिषदेच्या वतीने मंडळांचे स्वागत करण्यात आले.यावेळी राज्यमंत्री संजय भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे,उपनगराध्यक्ष संग्राम काकडे,जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे, शहराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, रवींद्रअप्पा भेगडे, नगरसेवक अरुण भेगडे पाटील, अमोल शेटे, नगरसेविका शोभा भेगडे, वैशाली दाभाडे, मंगल जाधव, प्राची हेंद्रे, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा रजनी ठाकूर, नगररचनाकार शरद पाटील,रवींद्र काळोखे आदी उपस्थित होते.अनिल धर्माधिकारी यांनी सूत्रसंचालन केले.रस्त्याच्या दुतर्फा सजावट पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

मानाचा पाचवा गणपती श्री.गणेश तरुण मंडळ शाळा चौकात आला .यावेळी राज्यमंत्री संजय भेगडे यांनी ढोलवादन केले. डाळ आळी येथील जय बजरंग प्रतिष्ठानच्या वतीने मंडळांचे स्वागत करण्यात आले तसेच कार्यकर्त्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.विवेकानंद मित्र मंडळानेही गणेश मंडळांचे स्वागत केले.

अमर खडकेश्वर मित्र मित्र मंडळ, सर सेनापती उमाबाई दाभाडे गणेश मंडळ,शिवभक्त मित्र मंडळ,राष्ट्रतेज तरुण मंडळ,शिवक्रांती मित्र मंडळ, जय भवानी तरुण मंडळ, सर सेनापती उमाबाई दाभाडे गणेश मंडळ,शेतकरी मित्र मंडळ आदी मंडळे मिरवणूक मार्गात सहभागी झाली होती.अनेक मंडळांनी तयार केलेली आकर्षक रोषणाई मन मोहून टाकत होती. अन्य मंडळांनी स्वतंत्र मिरवणुका काढल्या.

मानाच्या पहिल्या गणपतीचे विसर्जन रात्री ११वाजता झाले.रात्री उशिरा दीडच्या सुमारास भेगडे तालीम मंडळाच्या मानाच्या शेवटच्या गणपतीचे विसर्जन झाले. साडेसात तासांनी मुख्य मिरवणुकीची सांगता झाली. वरिष्ठ अधिकारी विनायक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

डिजेचा दणदणाट नाही थांबला;निसर्गप्रेमींची नाराजी
मिरवणूक काळात मुख्य मिरवणूक मार्गावर तसेच स्वतंत्रपणे काढलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत अनेक गणेश मंडळांनी डीजे वाद्याचा वापर केला. यावेळी गुलाल आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. अतिउत्साही कार्यकर्ते बेभान होऊन नाचत होते. डिजेचा कर्णकर्कश आवाजाचा दणका सुरू होता. कार्यकर्ते नाचगाण्यात दंग होते. डीजे वाद्याने आवाजाचे प्रदूषण होत असल्याने निसर्गप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. डीजेचा दणदणाट थांबत नव्हता. पोलीस हे सर्व हताशपणे पहात होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like