Talegaon Dabhade : ‘कॅम्पस प्लेसमेंट’मध्ये इंद्रायणी महाविद्यालयाच्या 54 विद्यार्थ्यांना एचडीएफसी बँकेकडून मोठे पॅकेज

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे इंद्रायणी महाविद्यालय, औषधनिर्माण शास्त्र (बी.फार्म) विभाग आणि एचडीएफसी बँकेच्या संयुक्त विद्यमाने इंद्रायणी महाविद्यालयात (दि. 7 एप्रिल) रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या. याबद्दल विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रात आयोजित कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विठ्ठल चोपडे, प्रा.विद्या भेगडे, प्रा.डी. पी. काकडे, प्रा.पी. एस. उतेकर, प्रा.डॉ. योगश झांबरे, प्रा.एस. एस. आवटे तसेच एचडीएफसी बँकेतर्फे प्रशांथा पॉल, विवेककुमार श्रीवास्तव, गुरप्रीत सिंग, आकाश शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

एचडीएफसी बँकेत आवश्यक असलेल्या बिझनेस डेव्हलपमेंट रीप्रेझेंटिटीव्ह (व्यवसाय विकास प्रतिनिधी) आणि सेल्स मॅनेजर (विक्री व्यस्थापक) या दोन पदासाठी एकूण 61 विद्यार्थी उमेदवारांनी मुलाखती दिल्या.त्यापैकी सर्व पात्रता निकषांवर आधारीत 54 विद्यार्थ्यांची निवड यावेळी करण्यात आल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली.

 

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्ती पत्र देण्यात येणार असल्याचे बँक लोन विभागाचे असिस्टंट व्हॉइस प्रेसिडेंट विवेककुमार श्रीवास्तव यांनी सांगितले. तसेच या उमेदवारांसाठी मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्र हे कार्यक्षेत्र असेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतातील खाजगी क्षेत्रातील नामांकित बँक असलेल्या एचडीएफसी बँकेत आज भारतभर एक लाखाच्या वर कर्मचारी काम करतात.त्यामुळे अशा ठिकाणी काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होते आहे याचा मनस्वी आनंद होत असल्याची भावना इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी आपल्या स्वागतपर प्रास्ताविकात बोलून दाखवली. तसेच मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम त्यांनी यावेळी केले.

 

या प्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे,कार्यवाह चंद्रकांत शेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे,फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विठ्ठल चोपडे बीबीए बीबीसीच्या प्रमुख व प्लेसमेंट समन्वयक प्रा. विद्या भेगडे, वाणिज्य विभागाच्या प्रमुख  प्रा आर आर भोसले तसेच दोन्ही महाविद्यालयाचे प्राध्यापक आदी मान्यवरांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

यावेळी एचडीएफसी बँकेचे श्रीवास्तव यांनी सांगितले की, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या निवड झालेल्या उमेदवारांना सहा ते सात लाखांचे पॅकेज देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना या  निमित्ताने नोकरीची संधी उपलब्ध झाल्याबद्दल पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.