Pune News: वसंत मोरे यांनी ‘फिलिंग इमोशनल’ म्हणत शेअर केली राज ठाकरे यांच्या फोटोची पोस्ट
एमपीसी न्यूज – राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजा विषयी केलेल्या वक्तव्यानंतर त्या विरोधी भूमिका घेतल्यामुळे वसंत मोरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहराध्यक्षपदावरून हटवण्यात आलं. साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्षपदी वर्णी करण्यात आली. त्यानंतर आज वसंत मोरे यांनी फेसबुक वर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
वसंत मोरे यांनी आपल्या फेसबूकवरील पोस्टमध्ये ‘फिलिंग इमोशनल’ असं म्हणत “मी आजच साहेबांच्या हस्ते उद्घाटन केलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान असे रंग भरले होते आणि आजच..” या आशयाची त्यांनी पोस्ट केली आहे.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर वसंत मोरे यांनी आपल्या प्रभागात भोंगे लावणार नसल्याचं सांगत आम्हाला शांतता हवीय, असं म्हटलं होतं. नंतर पुण्यातील मनसे आणि वसंत मोरे यांच्यात दूरी निर्माण झाली. कारण शहरातील इतर पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या आदेशाचं पालन करणार असल्याचं सांगितलं होतं.
त्यानंतर अचानक पुणे वसंत मोरे यांना पुणे शहराध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आलं. त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची निवड करण्यात आली. तसेच झालेल्या या फेरबदलामुळे भविष्यात याचा फटका वसंत मोरे यांना बसणार की मनसेला, त्याचे उत्तर निवडणुकीनंतर कळेलच.
दरम्यान वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना पक्षात येण्याचे निमंत्रण देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी वसंत मोरे यांच्यासह इतर मनसैनिकांनी ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावे, असं आवाहन केले. त्यामुळे वसंत मोरे नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.