Pune News: ‘प्ले बॉय’ होण्याचे स्वप्न दाखवत तरुणाला लावला 17 लाख रुपयांना चुना

एमपीसी न्यूज – प्ले बॉय होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाला सायबर भामट्यांनी 17 लाख 38 हजार रुपयांना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेले पैसे या तरुणाने भामट्यांना दिले होते.

दत्तवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 27 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दयाशंकर मिश्रा, रागिनी, विक्रम सिंग आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुण हा उच्चशिक्षित आहे. परंतु काम मिळत नसल्यामुळे तो घरीच बसून होता. वर्षभरापूर्वी त्याला सोशल मीडियावर प्लेबॉय झाल्यास भरपूर कमाई ची संधी अशी जाहिरात दिसली होती. या जाहिरातीला बळी पडून त्याने दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला आणि त्याची फसवणूक होण्याला सुरुवात झाली.

या सायबर भामट्यांनी त्याला इंडियन एस्कॉर्ट सर्व्हिस या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल असे सांगितले. तसेच प्लेबॉय होण्यासाठी परवाना काढावा लागेल आणि इतर कारणे सांगून त्याच्याकडे पैशाची मागणी केली. वेगवेगळ्या बँक खात्यात त्याला 17 लाख 38 हजार रुपये जमा करण्यास भाग पाडले.

इतके पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक बंद केले आणि या तरुणाला प्रतिसादही दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित तरुणाने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. दत्तवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.