Chikhali News: संतपीठातील प्रवेशप्रक्रिया पूर्ण; 327 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे संचालित चिखलीतील ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली. प्रवेश प्रक्रियेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  970 प्रवेशाचे अर्ज आले होते. त्यातून सोडत पद्धतीने 327 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला.

कंपनी कायदा 2013 च्या कलम 8 अंतर्गत महापालिकेने चिखलीत ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ स्थापन केले आहे. महाराष्ट्र स्वयंअर्थसाहाय्यित शाळा (स्थापना व विनिमय) नियम- 2012 अंतर्गत शाळेचे कामकाज सुरू आहे.

संतपीठामध्ये नर्सरी ते पाचवीपर्यंतच्या वर्गांमध्ये प्रवेश दिला जात आहे. येथील अभ्यासक्रम, व्यवस्थापन, कार्यपद्धती, अध्ययन आणि अध्यापन प्रणाली ‘सीबीएसई’ नुसार इंग्रजी माध्यमातून असेल. त्यामध्ये मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषांचा समावेश असेल.

2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज मागविले होते. निर्धारित केलेल्या प्रवेश क्षमतेपेक्षा तिपटीने अर्ज आल्याने ही प्रक्रिया व्यवस्थापनाच्या सूचनेनुसार सोडत पद्धतीने पार पडली. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात प्रवेशाची सोडत पालकांच्या संमतीने व मान्यवरांसह पालकांच्या हस्ते पार पाडण्यात आली.

महापालिकेचे उपायुक्त तथा संतपीठाचे संचालक संदीप खोत, संचालक राजू महाराज ढोरे, संचालिका डॉ. स्वाती मुळे, शिक्षण विभाग पर्यवेक्षक सुनील लांघी, रामदास लेंभे, पर्यवेक्षिका अनिता जोशी, मनपा आदर्श शिक्षिका सुनीता पवार, उषा काळोखे, आकांक्षा फाउंडेशनचे निखील एकबोटे उपस्थित होते.

शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये पूर्व प्रथमिक व प्राथमिक वर्गाच्या नर्सरीपासून ते इयत्ता पाचवीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. अतिशय उच्च दर्जाचे शिक्षण मिळत असल्याने पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे संतपीठाच्या संचालकांनी सांगितले.

शैक्षणिक वर्ष 2022-2023 साठी आलेल्या एकूण 970 प्रवेश अर्जांपैकी जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाची प्रवेश संख्या सोडत पद्धतीने निश्‍चित करण्यात आली.

नर्सरीसाठी मुली 35, मुले 35 – 70, ज्युनिअर के.जीसाठी मुली 15, मुले 15 – 30, सिनीअर के.जीसाठी 13 मुली,  14 मुले  – 27, पहिलीसाठी मुली 20, मुले 20 -40, दुसरी मुली 20, मुले 20 – 40, तिसरीसाठी मुली 20, मुले 20 -40, चौथीसाठी मुली 20, मुले 20 – 40, पाचवीसाठी मुली 20 आणि मुले 20 – 40 अशा 163 मुली आणि 164 एकूण 327 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.