Talegaon Dabhade : स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुलमध्ये संविधान दिन साजरा

एमपीसी न्यूज – श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ (Talegaon Dabhade) संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी (दि. 26) ‘राष्ट्रीय विधी दिन’ म्हणजे ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. घटना समितीने सादर केलेले भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ आजच्या दिवशी विविध उपक्रम राबविले जातात.

कार्यक्रमाची सुरुवात शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. विद्यालयाचे शिक्षक प्रशांत भालेराव, इयत्ता 8 वीची विद्यार्थिनी कु.सुरक्षा कटरे यांनी संविधानाचे सुश्राव्य वाचन केले.’संविधान दिन’ या विषयी शालेय शिक्षिका प्रियंका पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधान स्वीकारले व ते 26 जानेवारी 1950 रोजी भारतभर लागू झाले याविषयी सविस्तर माहिती दिली .

भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ साजरा होणाऱ्या संविधान दिनाची तत्वे व महत्त्व शालेय शिक्षक प्रशांत भालेराव यांनी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना सांगितली. शालेय स्तरावर संविधान दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमध्ये विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय मुख्याध्यापिका (Talegaon Dabhade) शमशाद शेख, सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. शाळेतील सर्व उपस्थित विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शालेय शिक्षिका विजयमाला गायकवाड यांनी केले.

श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष खांडगे, सचिव मिलिंद शेलार सर, शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे आदींनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. संविधानातील कायद्याचे, नियमांचे पालन करून या दिनाचे सार्थक करूया असा संकल्प करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.