Talegaon Dabhade: ‘त्या’ नर्सचा अहवाल ‘निगेटीव्ह’, शहराचा बहुतांश भाग कन्टेनमेंट झोनमधून वगळला!

Talegaon Dabhade: Good News! 'That' nurse's report was 'negative'for covid-19, excluding most of the city from the containment zone!

एमपीसी न्यूज – खासगी प्रयोगशाळेत केलेल्या कोरोना निदान चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने पुण्याच्या रुग्णालयात दाखल केलेल्या तळेगाव स्टेशन येथील एका नर्सचा शासकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे संबंधित महिला राहात असलेला भाग वगळता संपूर्ण तळेगाव शहर प्रतिबंधित क्षेत्रातून (कन्टेन्मेंट झोन) वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी ही माहिती दिली.  त्यावेळी आमदार सुनील शेळके उपस्थित होते. महसूल विभागाचे प्रशासकीय अधिकारी, तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासन, शहरातील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, विविध संस्था, संघटना तसेच सर्व नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांतून तळेगाव शहर कोरोनामुक्त ठेवण्यात यश आले होते. मात्र तळेगावात एक संशयित रुग्ण सापडल्याने तळेगाव शहर व परिसर कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर करावा लागला होता. त्यातच माळवाडी येथे राहणारी तिची सहकारी नर्स देखील कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याने सर्वांचीच चिंता वाढली होती.

संबंधित नर्सचा शासकीय प्रयोगशाळेतील कोरोना निदान चाचणीचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यात ती नर्स कोरोना निगेटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

शहरात संशयित कोरोना रुग्ण सापडल्यानंतर घोषित केलेल्या कन्टेनमेंट झोन म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्रातून आता संबंधित नर्स राहात असलेला भाग वगळून तळेगावचे उर्वरित सर्व क्षेत्र वगळण्यात आले असल्याचे शिर्के यांनी सांगितले. मावळ ऑरेंज झोन येत असल्याने आता तळेगावातील दुकाने व आस्थापना सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत सुरू ठेवता येणार आहेत. कन्टेन्मेंट झोनमध्ये मात्र सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेतच अत्यावश्यक सेवा व वस्तू उपलब्ध होऊ शकतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

शासनाच्या आदेशानुसार अजून हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम, केश कर्तनालये, सलून, स्पा, जिम्नॅशियम तसेच क्रीडांगणे सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असेही शिर्के यांनी सांगितले.

परिश्रम वाया जाणार नाहीत – सुनील शेळके

तळेगाव शहर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रशासन, विविध संस्था, संघटना, कार्यकर्ते व नागरिक या सर्वांनी आतापर्यंत घेतलेले कष्ट वाया जाणार नाहीत, असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला. कोरोना योद्धा असलेल्या आपल्या एका भगिनीला दुर्दैवाने कोरोनाची लागण झाल्याचा संशय होता, मात्र त्यांचा शासकीय प्रयोगशाळेतील कोरोना चाचणीचा अहवालही निगेटीव्ह आला, ही सर्वच तळेगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कन्टेनमेंट झोनमधून तळेगावचा बहुतांश भाग वगळण्यात आला असला तरी कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही, याचे भान सर्वांनी ठेवावे. वैयक्तिक व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी,  कोणत्याही कारणास्तव गर्दी करू नये, सुरक्षित अंतराचे पालन करावे, मास्क वापरावा तसेच सर्व शासकीय आदेशांचे पालन करून यापुढेही सहकार्य करावे, असे आवाहन शेळके यांनी केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.