Talegaon Dabhade : बेकायदा उत्खनन केल्याबाबत मावळच्या तहसीलदारांची तळेगाव नगरपरिषदेला नोटीस

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने आपल्या हद्दीतील इगल तळ्यामधील गाळ, माती व मुरूम या गौण खनिजाचे बेकायदेशीर व अनधिकृतपणे उत्खनन केले आहे. या बाबतचा खुलासा प्रशासनाने 7 दिवसाच्या आत न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशी नोटीस मावळचे तहसीलदार यांनी बजावल्याने शहर परिसरात खळबळ माजली आहे. या नोटिशीमुळे संबधित खात्याचे अधिकारी आणि गौण खनिजे परस्पर घेऊन जाणारे ठेकेदार यांचे धाबे दणाणले आहेत.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेने मागील काळात तळेगाव शहरातील इगल तळ्यातील सर्व्हे नं. 428 मधील गाळ, माती व मुरूम या गौण खनिजाचे बेकायदेशीर व अनधिकृतपणे उत्खनन केले आहे. या बाबत प्राप्त झालेल्या तक्रारी वरून गाव कामगार तलाठी यांनी समक्ष पाहणी करून उत्खनन केल्याचे मोजमाप केले असता त्यांचे पाहणीमध्ये नगर परिषदेने 2 लाख 376 ब्रास गाळ, माती व मुरूम या गौण खनिजाचे उत्खनन केल्याचे दिसून आले आहे. तसेच या उत्खनन करणे कामी शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नाही.

मावळचे तहसीलदार यांनी याबाबत तळेगावचे गाव कामगार तलाठी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालावरून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 (7) नुसार आपणावर दंडाची कारवाई पात्र ठरत असल्याचे नोटीशीमध्ये म्हटले आहे. सदरच्या नोटिशीचा खुलासा 7 दिवसात करावा. अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे नोटिशीमध्ये नमूद केले आहे. या नोटिशीमुळे संबधित खात्याचे अधिकारी आणि गौण खनिजे परस्पर घेऊन जाणारे ठेकेदार यांचे धाबे दणाणले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.