Talegaon Dabhade : भांडणे सोडविणाऱ्या तरुणावर खुनी हल्ला

Talegaon Dabhade: Murderous attack on a young man trying to resolve a dispute

एमपीसी न्यूज – घराबाहेर सुरू असलेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करत तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खुनी हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. 13) सकाळी पावणेबाराच्या सुमारास खळवाडी तळेगाव दाभाडे येथे घडली.

उमेर रतन सय्यद (वय 17, रा. खळवाडी, तळेगाव दाभाडे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुणाल ठाकूर, आकाश सरोदे, धीरज गरुड, शुभम आकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास फिर्यादी सय्यद यांच्या घराबाहेर त्यांचा मित्र रोहित भेगडे याला आरोपी आकाश आणि धीरज हे शिवीगाळ करून मारहाण करीत होते. त्यामुळे फिर्यादी आणि त्यांचा दुसरा मित्र प्रणव भेगडे हे भांडण सोडवण्यासाठी गेले.

त्यावेळी आरोपी आकाश याने तू आमच्या भांडणात का पडतो असे म्हणून पाठीमागून पकडले आणि आरोपी कुणाल याने सय्यद यांच्या डोक्यात कोयत्याने मारले. सय्यद यांनी कोयत्याचा वार हुकवला असता त्यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली.

त्यानंतर आरोपी कुणाल आणि आकाश या दोघांनी मिळून सय्यद यांचा मित्र रोहित भेगडे यांच्याकडे 25 हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आरोपी धीरज आणि शुभम या दोघांनी सय्यद यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आकाश सरोदे याला अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.