Talegaon Dabhade : तळेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसची रविवारी जाहीर सभा

तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे आणि उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांची माहिती

एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी (दि ३) येथील मारुती मंदिर चौकात दुपारी २.३० वाजता ‘निर्धार परिवर्तनाचा, साद राष्ट्रवादीची…साथ महाराष्ट्राची संपर्क यात्रा २०१९’ अंतर्गत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी दिली.

यावेळी भेगडे म्हणाले, या परिवर्तन यात्रेस ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी अर्थमंत्री सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, प्रदेश महिलाध्यक्षा चित्रा वाघ आदी दिग्गज नेते संबोधित करणार आहेत.

  • या सभेस माजी राज्य मंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, निरीक्षक विजयराव कोलते, अंकुश काकडे आदी उपस्थित राहणार आहेत.

सभेच्या नियोजनासंदर्भात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुनीता काळोखे यांच्या निवासस्थानी बुधवारी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष गणेश काकडे, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे, नगरसेवक तथा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष भेगडे,
तालुका युवकअध्यक्ष सुनिल दाभाडे आणि सहकाऱ्यांनी संयोजन केले आहे. या परिवर्तन यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास बबनराव भेगडे यांनी व्यक्त केला आहे.

  • या विषयावर गाजणार सभा
    या सभेत छत्रपती शिवाजीमहाराजांचे समुद्रातील स्मारक का पूर्ण झाले नाही?, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी झाली का?, प्रत्येकाच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये आले का?, बैलगाडा शर्यत आत्तापर्यंत का चालू झाली नाही, डान्स बार का चालू झाले? आरक्षणाच्या
    नावाखाली जनतेला का फसविता, तुमच्या घरातील किती तरुणांना सरकारी आणि खासगी नोकऱ्या मिळाल्या, नोटाबंदीमुळे नागरिकांचा किती आणि काय फायदा झाला, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या किमती कमी झाल्या का?, जनतेच्या पैशाची बचत करा, फसव्या जाहिराती बंद करा, जनतेने केला निर्धार हे सरकार आता हद्दपार, या मुद्द्यांवर नेते मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांच्या उमेदवरीचा आग्रह बहुतांश कार्यकर्त्यांनी धरला असल्याने या सभेबाबत तालुक्यात विशेष उत्साहाचे वातावरण आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.