Chakan : चाकणला २५० गाड्या कांद्याची आवक; भावात अपेक्षित सुधारणा होईना

कमालभाव ९०० रुपयांवर पोहचले

एमपीसी न्यूज – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डात कांद्याची आवक वाढतच असून आज तब्बल ५२ हजार पिशवी कांद्याची आवक झाली. देशांतर्गत बाजारात कांद्याच्या बाजारभावातील घसरण सुरूच असताना इतर देशांतून मोठी मागणी असल्याने चाकण मार्केट मधून कांद्याची निर्यात सुरु झाली आहे.

चाकण मार्केटमधून देशांतर्गत बाजारात कांद्याची पाठवणी सुरु सुरु झाली असून परदेशातही निर्यातीस सुरुवात झाल्याचे निर्यातदार कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे कांद्याच्या कांद्याचे दर काही परमात वधारले असून बुधवारी येथील बाजारात कांद्याचे दर प्रतिक्विंटलला ९०० रुपयांपर्यंत पोहचले.

चाकण मार्केटमध्ये २५० वाहनांतून २६ हजार क्विंटल म्हणजे सुमारे ५२ हजार पिशव्यांची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात मोठी सुधारणा झाली असून ५०० ते ९०० रुपये एवढा कांद्याला भाव मिळाल्याचे बाजार समितीचे सचिव सतीश चांभारे यांनी सांगितले.

  • दरम्यान, प्रतवारी न झालेल्या कांद्याला आणि कमी प्रतीच्या कांद्याला ३०० ते ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाल्याचे काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. सरसकट सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने अद्यापही नाराजी कायम आहे. अधिक दिवस कांदा काढणी प्रलंबित ठेवता येत नसल्याने काढणीवर आलेला कांदा शेतकरी बाजारात आणत आहेत. त्यामुळे कांद्याची भरमसाठ आवक होत असून आठवड्यातून दोन दिवस कांद्याचे लिलाव होऊनही जेवढा कांदा येतो. त्याचे लिलाव पूर्ण करून साठवणुकीस अडचणी येत असल्याचे आडतदार, दलाल आणि व्यापार्यांकडून सांगण्यात येत आहे.

देशातील अन्य राज्यात आणि परदेशात कांद्याची निर्यात चाकण मार्केटमधून मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे. त्यामुळे बुधवारी कांद्याचे कमालभाव ९०० रुपयांपर्यंत पोहचले. पुढील काळात कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची अपेक्षा बाजार समितीचे संचालक राम गोरे, व्यापारी भरत गोरे, प्रशांत गोरे, माणिक गोरे, जमीर काझी यांच्यासह कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांनी व्यक्त केली आहे.

९०० रुपये भाव मिळालेला निर्यातक्षम कांदा
  • निर्यात सुरु; दरात वाढ अपेक्षित
    देशांतर्गत बाजारात कांद्याच्या बाजारभावातील घसरण सुरूच असताना इतर देशांतून मोठी मागणी असल्याने कांद्याची निर्यात सुरु झाली आहे. जगातील प्रमुख देशांमध्ये प्रतिकूल हवामानामुळे कांदा उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे जगाच्या बाजारपेठेत भारतीय कांद्याची मागणी वधारली आहे. भारत हा चीनच्या खालोखाल जगातील दुस-या क्रमांकाचा कांदा उत्पादक देश आहे.
९०० रुपये क्विंटल असा भाव मिळालेला निर्यातक्षम उच्च प्रतीचा कांदा.

गुलाबी कांद्याला मोठी मागणी

भारतीय कांद्याला सर्वाधिक मागणी आखाती देशांतून असून युरोप आणि अमेरिकेतही कांद्याला मागणी आहे. भारतीय कांद्याला बांगलादेश, सिंगापूर, थायलंड, मालदीव, नेपाळ, हाँगकाँग आणि इंडोनेशिया या देशांतून सध्या मागणी वाढत आहे. गुलाबी आणि पांढ-या कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याला मोठी मागणी असून निर्यात सुरु झाल्याने कांद्याचे दर सुधारतील, अशी शक्यता बड्या निर्यातदार कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून व्यक्त होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.