Chakan News : कांदा आणखी रडवणार? चाकण मार्केटमध्ये कांदा 32 रुपये किलो

एमपीसी न्यूज – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये कांद्याच्या व बटाट्याच्या आवकेत घसरण झाली आहे, त्यामुळे भावात वाढ झाली आहे. चाकण मार्केट मध्ये कांद्याची 500 क्विंटल आवक होऊन कांद्याला प्रती क्विंटलला 2 हजार ते 3 हजार 200 रुपये एवढा भाव मिळाला. बटाट्याची 750 क्विंटल आवक होऊन 1 हजार 500 ते 2 हजार रुपये एवढा प्रतीक्विंटलला भाव मिळत असल्याची माहिती खेड बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली.

परदेशातून कांदा आयात झाला तरीही कांद्याचे भाव पुढील काही दिवस चढेच राहण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. यंदाच्या संततधार पावसामुळे मुळातच येथील बहुतांश भागात कांदा लागवड उशीरा झाली, त्यातच अवकाळी पावसाने साठवणूक केलेल्या कांद्याला दणका दिला आहे. घाऊक बाजारात कांदा प्रती किलोला 20 ते 32 रुपयांच्या दरम्यान स्थिर असून किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा 25 ते 35 रुपये प्रती किलोने विक्री होत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.