Talegaon Dabhade : श्रीमंत सरसेनापती खंडेराव येसाजी दाभाडे यांच्या 290 व्या पुण्यतिथी दिनी आदरांजली

एमपीसी न्यूज- मराठा साम्राज्यातील शूरवीर सरदार श्रीमंत सरसेनापती खंडेराव येसाजी दाभाडे यांच्या 290 व्या पुण्यतिथी दिनी शुक्रवारी (दि 27) त्यांच्या तळेगाव दाभाडे येथील समाधीस्थळी आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी श्रीमंत दाभाडे राजघराण्यातील मान्यवर, विविध क्षेत्रातील मंडळी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होती. माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, सरसेनापती उमाबाई दाभाडे महिला व बालकल्याण संस्थेच्या अध्यक्षा याज्ञसेनीराजे दाभाडे, संध्याराजे दाभाडे यांनी समाधीचे दर्शन घेऊन प्रथम आदरांजली वाहिली.

प्रा. डॉ. प्रमोद बोराडे यांनी सरसेनापती खंडेराव येसाजी दाभाडे यांच्या पराक्रमाच्या ऐतिहासिक घटनांना उजाळा देताना सांगितले, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य आणि सुराज्याचा वसा सरदार खंडेराव दाभाडे आणि वीरांगना सरसेनापती उमाबाई दाभाडे यांनी पुढे नेला. समाजातील सर्व जातीधर्माच्या लोकांना समान न्याय, समान मान, समान संधी देत सुराज्याचा कारभार केला.

पत्रकार अमीन खान म्हणाले, की दाभाडे राजघराण्यातील हल्लीच्या पिढीकडून समाज आणि राजकारणात लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. सरसेनापती हे त्यांच्या प्रेरणेचे केंद्र आहे. यावेळी आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील समाधीचे दर्शन घेतले.

नगरसेविका वैशाली दाभाडे, बलुतेदार संस्थेचे दिनेश कोतुळकर, प्रसिद्ध निवेदक अनिल धर्माधिकारी, सर्पमित्र निलेश गराडे, सुरेश शिंदे, तळेगाव दाभाडे भाजपा युवा मोर्चा कार्याध्यक्ष प्रशांत दाभाडे, आनंद दाभाडे, नितीन दाभाडे, मुख्याध्यापिका, शिक्षिका, शिक्षक आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन आनंद दाभाडे आणि सहकाऱ्यांनी केले. यावेळी खाऊवाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.