Talegaon Dabhade : सामाजिक विषयावरील प्रबोधनात्मक देखाव्यांना तळेगावकरांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज- सात दिवसांचा गणपती उत्सव साजरा होत असलेल्या तळेगाव शहरात सजावट पाहण्यासाठी ग्रामीण भागातून नागरिकांनी गर्दी केली असल्याने रस्ते फुलून गेले आहेत. यावर्षी बहुतेक मंडळांनी जिवंत आणि हलत्या देखाव्यावर भर दिला आहे. अनेक मंडळांनी जिवंत देखावे सादर करून समाजप्रबोधन केले आहे.

1903 मध्ये स्थापन झालेल्या मानाच्या पहिल्या श्री डोळसनाथ गणेशोत्सव मंडळाने फुलांची आरास केली आहे. 25 कलाकारांच्या सहाय्याने विठू माझा लेकुरवाळा हा जिवंत देखावा सादर केला आहे. मंडळाचे स्वतःचे ढोल -ताशा पथक आहे. मंगेश दाभाडे हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

तळेगाव शहरातील मानाचा दुसरा गणपती असलेल्या श्री कालिका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी 17 फुट उंचीचे भव्य कलश मंदिर उभारले आहे. मंदिर प्रवेशद्वारावर असलेले कारंजे लक्ष वेधून घेत आहे. तसेच प्रवेशद्वारावरील दोन गजराजच्या मूर्ती बालगोपाळांच्या आकर्षणाचा विषय ठरल्या आहेत. मंडळाची स्थापना 1904 मध्ये झाली असून माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभुळकर हे मंडळाचे अध्यक्ष आहेत.

बनेश्वर मित्र मंडळाने यावर्षी समाज आणि विशेषतः युवा पिढीला मार्गदर्शन करताना ‘असुद्या कर्तव्याचे भान’ हा 10 कलाकारांच्या सहाय्याने जिवंत देखावा सादर केला आहे. मंगेश भोसले यांच्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले आहे. मंडळाची स्थापना 1974 मध्ये झाली असून संग्राम कोपणर हे अध्यक्ष आहेत.

चावडी चौक मित्र मंडळाने यंदा वज्र महल हा आकर्षक देखावा सादर केला आहे. हा देखावा नागरिकांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. तसेच यावर्षी मंडळाने शिक्षणाचा बाजार यावर प्रकाशझोत टाकणारा जिवंत आकर्षक देखावा सादर केला आहे. चावडी चौक मित्र मंडळाची स्थापना१९७४ मध्ये झाली असून मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील शाम दाभाडे आहेत.

शिवक्रांती मित्र मंडळाने यंदा ‘संस्काराची ऐसी तैसी’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. यामध्ये १४ कलाकार काम करतात. ऋषिकेश आगळे हे शिवक्रांती मित्र मंडळाचे अध्यक्ष आहेत.

   

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.