Talegaon Dabhade : अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकावर कायदेशीर कारवाई करणार -दीपक झिंजाड

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मालमत्ता कराची आणि पाणीपट्टी कराची वसुली या आर्थिक वर्षात ९० टक्के करणार असून मोठी रक्कम थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकावर कायदेशीर कडक कारवाई करणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी पत्रकारांना सांगितली.

नगरपरिषदेकडून सन १९-२० या सालातील २३ कोटी २५ लाख १३ हजार ४८७ रुपये एकून मालमत्ता कराची वसूली करावयाची आहे. त्यात ६ कोटी ८९ लाख ७० हजार रुपयांची मागील थकबाकी आहे.तर चालू वर्षाचे १६ कोटी ३५ लाख ४२ हजार रुपये वसूल  करणे आहे.आत्ता पर्यंत लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता असल्यामुळे अतिशय अल्प वसुली झाली असल्याचे मुख्याधिकारी झिंजाड यांनी सांगितले.

नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाची पाणीपट्टी सुमारे ६ कोटी रुपये वसूल करावयाचे असून त्यामध्ये सुमारे  ३ कोटी हि मागील थकबाकी आहे, असे पाणी पुरवठा विभागप्रमुख स्मिता गाडे यांनी सांगितले. पाणीपुरवठा विभागात शहरात १५६५१ नळजोड आहेत. त्यातील ५८५३ ग्राहकांना पाणी मीटर बसविले आहेत. त्यांना सप्टेबर अखेरपर्यंतची मीटरप्रमाणे बिले देण्यात आली आहेत.

नगरपरिषदेकडून मिळकत करांची व पाणीपट्टीची बिले अद्यापही काही मिळकतधारकांना पोहचली नसल्याने त्यांचेकडून कर भरण्यास विलंब होत आहे. सध्या मुख्याधिकारी झिंजाड यांनी वसुली विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांची आढावा बैठक घेऊन वसुली बाबतच्या अडचणी समजून घेतल्या. कामात चाल ढकल करणा-यावर कारवाई केली जाईल, असा इशाऱा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.