Talegaon : नियोजनबद्ध पद्धतीने झाली किशोर आवारे यांची हत्या?

एमपीसी न्यूज – जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची (Talegaon ) हत्या भर दिवसा करण्यात आली. तळेगाव दाभाडे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी हत्या करून आरोपी पळून गेले. शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घटना घडली. त्यानंतर आयुक्तालयातील गुन्हे शाखेची पथके आणि पोलीस ठाण्याची विविध पथके आरोपींच्या मागावर रवाना करण्यात आली. मात्र रात्री उशिरापर्यंत एकही आरोपी पोलिसांना मिळून आला नाही. त्यामुळे आरोपींनी नियोजनबद्ध पद्धतीने शांत डोक्याने हा गुन्हा केल्याचे म्हटले जात आहे.

किशोर आवारे शुक्रवारी दुपारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटून परत येत असताना नगरपरिषदेच्या मुख्यालयासमोर त्यांची हत्या करण्यात आली. यावेळी आरोपी नगरपरिषद कार्यालय परिसरात दबा धरून बसले होते. हे आरोपी नगरपरिषद कार्यालयाच्या पाठीमागील बाजूने आले असल्याचे म्हटले जात आहे. आवारे मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती आरोपींनी मिळवली असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. त्यानुसारच आरोपींनी नगरपरिषद कार्यालय परिसरात दबा धरला.

Kondhwa : कोंढव्यातील हुक्का पार्लरवर छापा ; 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

सुरुवातीला आरोपींनी आवारे यांच्या मानेत गोळी झाडली. त्यानंतर आवारे जमिनीवर कोसळले असता पुन्हा त्यांच्या पोटामध्ये गोळी झाडण्यात आली. त्यानंतर आरोपींनी कोयत्याने अनेक वार करत आवारे यांची हत्या केली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामध्ये निर्घृणपणे केलेली हत्या चित्रित झाली आहे. हा धक्कादायक प्रकार घडताना नगरपरिषद कार्यालयात आलेले नागरिक उपस्थित होते. नागरिकांसमोर हा प्रकार घडल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुठलाही विचार न करता आरोपींनी हत्येसारखा गंभीर गुन्हा केला. आरोपींनी घटनास्थळी येताना कोणतेही वाहन आणले नव्हते. गुन्हा करून जाताना त्यांनी दोन दुचाकीस्वारांना पिस्तुलाचा धाक दाखवला. त्यातील एकजण बँक कर्मचारी आहे. तो जेवणाची सुट्टी झाल्याने जेवण करण्यासाठी घरी जात होता. त्याच वेळी आरोपींनी त्याला पिस्तुल दाखवून धमकावले आणि त्याची दुचाकी घेऊन पळून गेले.

आरोपींनी गुन्हा केल्यानंतर चेहरा देखील झाकला नाही. उघड माथ्याने ते पळून गेले. त्यामुळे त्यांना कुठलेही भय नसल्याची चर्चा तळेगावात सुरु आहे. एकंदरीत संपूर्ण घटनाक्रमावरून ही नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हत्या असल्याचे अनेकजण सांगत आहेत. मतभेद, राग कितीही टोकाचा असला तरी एवढी प्रचंड हिंस्रता येते कुठून, असाही प्रश्न यानिमिताने उपस्थित (Talegaon ) झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.