Talegaon News : द्रुतगती मार्गावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर किवळे येथे एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला तळेगाव दाभाडे पोलिसांनी जळगावातून अटक केली आहे. 4 ऑगस्ट 2020 रोजी भर दिवसा दुपारी तीन वाजता ही घटना घडली होती.

करमवीर गुलाबराम जैसवार (वय 30, सध्या रा. मानकोली फाटा, दिवागाव, ता. भिवंडी, जि. ठाणे. मूळ रा. बिसनपुर, ता. किराकत, जि. जौनपुर, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर किवळे येथे रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेवर एका ट्रक चालकाने बलात्कार केल्याची घटना 4 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता घडली होती.

आरोपीने कोयत्याचा धाक दाखवून पीडित महिलेचे कपडे देखील फाडले होते. या अमानुष कृत्याबद्दल तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीबाबत काहीही माहिती नसल्याने पोलिसांनी  सुरुवातीला आजूबाजूच्या बांधकाम साईट वरील कामगार, परराज्यातून आलेले कामगार आणि सराईत गुन्हेगार यांची माहिती काढली.

मात्र, पोलिसांना काहीही धागा सापडला नाही. त्यानंतर तळेगाव पोलिसांनी या गुन्ह्याचा स्मार्ट पद्धतीने तपास केला.

गुन्हा घडण्याच्या वेळी किवळे उड्डाणपुलावरून गेलेल्या 30-32 ट्रकची माहिती काढली. पोलिसांनी निवडून काढलेल्या एका ट्रकमध्ये पीडित महिलेकडून आरोपीचे वर्णन घेतल्याप्रमाणे एक ट्रक चालक आढळून आला.

पोलिसांनी त्या ट्रकची माहिती काढून ट्रक मालकाला गाठले. त्यावेळी मालकाने सांगितले की, त्या चालकाने ट्रक वरील काम नुकतेच सोडले असून तो दुसऱ्या कंपनीच्या ट्रकवर काम करत आहे.

पोलिसांनी दुसऱ्या कंपनीतील ट्रक मालकाशी संपर्क करून आरोपी करमवीर याची माहिती काढली. आरोपी ट्रक घेऊन नागपूरला जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आरोपीला ताब्यात घेतले.

करमवीरकडे गुन्हयाबाबत चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 25 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कामगिरी सदरचा पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शहाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे, पोलीस कर्मचारी अतिश जाधव, सतिश मिसाळ, राम बहिरट, शिंदे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.