Talegaon News : तळेगाव-चाकण महामार्गाच्या रुंदीकरणाचे भूमीपूजन

आमदार शेळके यांचा यशस्वी पाठपुरावा, 18 मीटर रुंद होणार रस्ता

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील तळेगाव-चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 55 चे तळेगाव दाभाडे येथील वडगाव फाटा ते इंदोरी या भागांमध्ये रुंदीकरण होणार आहे. वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येतून यामुळे तळेगावकरांची सुटका होणार आहे. या कामाचे भूमीपूजन मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 8) रोजी पार पडले.

तळेगाव चाकण शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक असल्यामुळे तळेगाव शहर व परिसरात वारंवार अपघात होत होते. यामुळे औद्योगिक वाहनांना दिवसा बंदी घालण्यात आली होती. या महामार्गावर वाढलेली अपघात व वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता आमदार शेळके यांनी रस्ता रुंदीकरणासाठी सहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बबन भेगडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, नगरसेवक गणेश खांडगे, नगरसेविका वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, संगीता शेळके, ज्योती शिंदे, निशा पवार, कृती समितीचे दिलीप डोळस, गणेश बोरुडे, संजय चव्हाण व इतर सदस्य, पत्रकार बंधु उपस्थित होते.

“तळेगाव-चाकण रस्त्याच्या दुरुस्ती आणि देखभालीकडे कायम दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे अपघात व वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे. नगरपरिषद व संबंधित विभाग यांनी विद्युत खांब स्थलांतरीत करावे. रस्ता रुंदीकरणास सर्वांनी सहकार्य केल्यास लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण होईल.” असे शेळके म्हणाले.

यावेळी सूत्रसंचालन अनिल धर्माधिकारी यांनी तर प्रास्ताविक गणेश खांडगे यांनी केले. बबनराव भेगडे व कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे यांनी आभार मानले.

तळेगाव चाकण महामार्गावर किलोमीटर 00/00 किमी ते १/500 किमी व 3/00 किमी ते 4 /100 किमी असा 2 किमी 600 मीटर लांबी मध्ये अस्तित्वात असलेल्या 10 मीटर रस्त्याचे रुंदीकरण करून तो 18 मीटर रुंद करण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन अपघातांची संख्या घटणार असून प्रवासाचा वेळ देखील वाचणार आहे.

रस्त्याचे रुंदीकरण करत असताना भविष्यात रस्ता मजबूत रहावा यासाठी 150 एम एम जाडीचा जीएसबी (ग्रणुलार सब बेस ), 250 एम एम गाडीचे डब्ल्यू एम एम ( वेट मिक्स मॅकॅडम ), 110 एम एम जाडीचे डी बी एम ( डेन्स बिटुमेन मॅकॅडम ) व 40 एम एम झाडीचे बीसी ( बिटुमेन काँक्रीट )असे थर असणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता वैशाली भुजबळ यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.