Talegaon News: डॉ. अनंत परांजपे यांच्यावरील ‘ध्यासपुरुष’ हे ई-पुस्तक प्रकाशित

एमपीसी न्यूज –  डॉ अनंत परांजपे एक कर्मयोगी, ध्यासपुरुष, नाटक, कलापिनी, कलाप्रशिक्षण व त्या अनुषंगाने येणारे सर्व कलाप्रकार,कलापिनीचा रंगमंच या सर्वांचा ध्यास घेऊन त्याचा सतत पाठपुरावा करणारे एक आगळे व्यक्तिमत्व! त्यांच्या कला प्रवासावर आधारित ‘ध्यासपुरुष’ या ‘ई-पुस्तकाचा प्रकाशन समारंभ कलापिनी सांस्कृतिक केंद्रात कोविड-19 चे सर्व नियम पाळून मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत रविवारी संपन्न झाला. हाच समारंभ फेसबुक लाइव्ह पद्धतीने  जगभरच्या रसिकांसाठी उपलब्ध होता.

या प्रसंगी कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर,या पुस्तकाचे लेखक प्रा. शिरीष अवधानी, प्रकाशिका योगिनी अवधानी-पाटील व सह प्रकाशिका अश्विनी अकोलकर आणि डॉ. अनंत परांजपे व डॉ. अश्विनी परांजपे व्यासपीठावर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व विराज सवाई, डॉ. विनया केसकर आणि विनायक लिमये यांच्या नांदी गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली  कलापिनीचा युवा कलाकार विराज सवाई याने प्रास्ताविक केले. कलापिनीचे अध्यक्ष मा.विनायक लिमये यांनी  नुकतेच निधन झालेल्या डॉ. दिलीप भोगे,कलापिनीचे माजी अध्यक्ष प्रकाशराव जोशी, आजीव सदस्य सुनील पेंडसे, ललित प्रभू. हास्ययोगी रमेश गुरव,जगन्नाथ शिंदे, मुकुंद खळदे, सतीश खळदे तसेच  सुप्रसिद्ध आभिनेत्री आशालता वाबगावकर या मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण केली

डॉ.अनंत पराजपे यांचे बंधू प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अरविंद परांजपे यांनी परांजपे कुटुंबीयांच्या वतीने मनोगत व्यक्त केले व डॉ.अनंत परांजपे यांच्या कलापिनी व्यतिरिक्तच्या जीवनाविषयी त्यांच्या संस्काराविषयी भाष्य केले. प्रकाशकांच्या वतीने योगिनी अवधानी व अश्विनी अकोलकर यांनी मनोगत व्यक्त केले व कलेचा ध्यास घेतलेल्या ध्यासपुरुषाचा कलाप्रवासावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून डॉ.परांजपे यांना व अवधानी सरांना धन्यवाद दिले.

या नंतर या पुस्तकाचे लेखक प्रा. अवधानी यांनी कलाकार, कार्यकर्ते घडविणारे कलापिनीद्वारे विविध संकल्पना राबविणारे डॉ.अनंत परांजपे यांच्यावर पुस्तक लिहिण्याची भाग्य लाभल्याबद्दल संतोष व्यक्त केला व हे ई -पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचावे व याचे देणगीमूल्य कलापिनीच्या रंगमंच प्रकल्पासाठी द्यावे अशी विनंती केली.

तळेगावकर आणि तळेगावच्या गुणी माणसांवर मनापासून प्रेम करणारे प्रा. अवधानी सर त्यांना अनेक शारीरिक व्याधी असूनही जिद्दीने हे कार्य करीत आहेत त्यांनी या आधी गान तपस्वी कै. पं. शरदराव जोशी यांच्यावर ही पुस्तिका लिहिली होती तसेच कर्करोगाशी निकराने लढा देणाऱ्या मी शतायुषी होणारच या अश्विनी अकोलकरवर आधारित पुस्तकाचेही प्रकाशन केले होते.

डॉ.अनंत परांजपे यांनी आपल्या मनोगतात आपण सर्वांनी माझे केलेले कौतुक हे माझे नसून कलापिनीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आहे, असे सांगितले व मी हे सर्व कार्य मला माझ्या आई डॉ. मंगला परांजपे आणि वडील डॉ. शं. वा. परांजपे यांनी केलेल्या संस्कारामुळेच करू शकलो, सकारत्मक दृष्टीच आपल्याला सर्व परिस्थितीत यशस्वी व्हायला सहाय्य करते, असे सांगितले.

डॉ. विनया केसकर यांनी त्यांच्या सुंदर शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. नटराजाच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

हा आगळा-वेगळा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ.विनया परांजपे, विराज सवाई, विनायक लिमये, चेतन पंडित, दीपक जयवंत, प्रतीक मेहता, शार्दुल गद्रे, आदित्य धामणकर, कलापिनीचे सहसचिव अशोक बकरे, रश्मी पांढरे व रामचंद्र रानडे यांनी विशेष सहाय्य केले. हे पुस्तक कलापिनीच्या पेज वरून डाउनलोड करता येईल ऐच्छिक देणगी मूल्याचे स्वागत आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.