Talegaon News : शहरातील 23 पैकी फक्त एकच शाळा सुरू

एमपीसी न्यूज – शिक्षकांची कोविड -19 ची चाचणी झालीच नसल्यामुळे तळेगाव शहरातील 23 पैकी फक्त एकच शाळा सुरू ठेवण्यात आली होती. तळेगाव स्टेशन येथील सरस्वती विद्या मंदिर याच एका शाळेतील शिक्षकांची कोविड -19 ची चाचणी करण्यात आली आहे. मात्र या शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थितीही अत्यल्प असल्याचे चित्र समोर आले आहे. 

शासनाच्या आदेशान्वये सोमवार (दि. 23) रोजी इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू कराव्यात अशी सूचना तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनास प्राप्त झाली होती. या सूचनेनुसार तळेगाव परिसरामध्ये असलेल्या माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील संस्थाचालकांना तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संपत गावडे यांनी सर्व शाळांमध्ये निर्जंतुकीकरण करावे व शाळा सुरू कराव्यात असे आदेश दिले होते.

परंतु शाळेमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांची कोविड-19 ची तपासणी करून घेऊन तिचा अहवाल योग्य असेल तरच त्या शिक्षकास वर्गावर शिकविण्याची परवानगी द्यावी, असे शासनाने सूचित केले होते .

तळेगाव परिसरातील 23 शाळा पैकी 22 शाळांमधील शिक्षकांची covid-19 ची तपासणी झाली नाही. तर फक्त तळेगाव स्टेशन येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेतील शिक्षकांची तपासणी पूर्ण झाली. त्यामुळे ती माध्यमिक शाळा आपले इयत्ता नववी व दहावीचे वर्ग भरू शकली.

यामध्ये इयत्ता नववीची पटसंख्या 107 एवढी असताना त्यामध्ये फक्त सहा विद्यार्थी उपस्थित राहिले. तर इयत्ता दहावीची पटसंख्या 112 एवढी असताना त्यामध्ये फक्त दोन विद्यार्थी उपस्थित राहिले होते.

या सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थी यावर्षी मावळात इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. परंतु शाळेने व प्रशासनाने सुरू केलेल्या शाळेच्या वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यंत नगण्य असून पालक शाळेमध्ये विद्यार्थी पाठविण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत नाहीत.

फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यावर भर

खबरदारी म्हणून मुले आणि मुली यांना दिवसाआड शाळेत उपस्थित राहण्यास परवानगी दिली असून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यावर भर देण्यात येत असल्याचे मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांनी सांगितले.

या विद्यालयातील माध्यमिक विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. शाळेत थर्मामीटर, थर्मल स्क्रीनिंग आणि जंतुनाशकाचा वापर करण्यात येत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.