Talegaon News : योग्य नियोजनाने काम करा अन्यथा पाण्यासाठी होणारा खर्च पाण्यात जाईल – किशोर भेगडे

एमपीसी न्यूज – तळेगाव येथील नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेत नगरपरिषदेकडून मोठ्या प्रमाणात काम केले जात आहे. त्या कामाचा दर्जा चांगला नाही. त्यामुळे आजवर झालेल्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पुढील काम करावे. पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य ते नियोजन करा अन्यथा पाण्यासाठी होणारा खर्च पाण्यात जाईल, असे निवेदन शहर विकास व सुधारणा समितीचे गटनेते किशोर भेगडे यांनी मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना दिले.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील अनेक त्रुटीबाबत या निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. नवीन पाणीपुरवठा योजना ही राज्य शासनाच्या नगरोत्थान योजनेतून सुरू आहे. याबाबत शासनाकडून 52 कोटी पैकी आतापर्यंत सुमारे 22 कोटी रुपये एवढी रक्कम नगरपरिषदेस प्राप्त झाली आहे. हे काम आर ए घुले या ठेकेदार कंपनीला दि 18 फेब्रुवारी 2019 मध्ये दिले आहे. या कामांमध्ये जॅकवेल ते फिल्टर प्लान्टपर्यंत मोठी वाहिनी टाकणे, पाण्याच्या साठवण टाक्या, वितरण नलिका, फिल्टर प्लान्टची कामे व स्कोडा सिस्टिम आदी कामांचा समावेश आहे;

परंतु या कामावर तांत्रिक सल्लागार समिती (पीएमसी) 17 जानेवारी 2020 मध्ये नियुक्त करण्यात आली आहे. त्या कंपनीची नियुक्ती होण्यापूर्वी सदर कामास सुरूवात झाली आहे. या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ठ असून झालेल्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करूनच ते काम सुरू करावे, असे निवेदनात म्हटले आहे. तसेच म्हस्करनेस काॅलनी 1 मध्ये नवीन पाण्याची टाकी उभारावी त्यामुळे तुकारामनगर, न्यू आनंदनगर, राव काॅलनी या भागातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटू शकेल.

तळेगावची भौगोलिक रचना पाहिली तर उंच व सखल आहे. अशा ठिकाणी वितरण नलिका जास्त व्यासापासून कमी व्यासाच्या म्हणजे उतरत्या क्रमाच्या (रिड्युसिंग) असल्या पाहिजेत. तरच उंच भागातील घरांपर्यंत पाणी मिळेल; परंतु आताच्या कामाच्या आदेशानुसार वितरण नलिका सरसकट 4″ व्यासाच्या आहेत. त्यामुळे उंच भागातील घरांपर्यंत पाणी मिळणे अवघड होईल त्यामुळे नवीन पाईपलाईन करून त्यावर वाढीव खर्च करून उपयोग होणार नाही सर्व खर्च पाण्यात जाईल असे ही भेगडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

त्याचबरोबर सोमाटणे येथील जॅकवेल पासून चौराई फिल्टरपर्यंत पाईपलाईनमधून वारंवार पाणी गळती होत असून त्यावरील नगरपरिषदेचा खर्च वाढत आहे. ती पाईपलाईन प्रथमतः प्राधान्याने बदलणे गरजेचे आहे.

तसेच स्टेशन भागातील वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होतो त्यावर लवकर उपाययोजना कराव्यात. या नवीन योजनेत इंद्रायणी नदीवर जॅकवेल तसेच व्ही. टी. पंपाची तरतूद असून सुद्धा ते काम अग्रक्रमाने न केल्याने स्टेशन भागातील पाणीपुरवठा सतत विस्कळीत होत आहे. ते काम प्राधान्याने करून स्टेशन भागाचा पाणीपुरवठा सुरळीत करावा. एवढा वाढीव खर्च करूनही उपयोगाचे नाही. पवना व इंद्रायणी अशा दोन्हीही नद्यांवरून 25 ते 26 एमएलडी पाणी उचलूनही तळेगावकर नागरिकांना पाणी मिळत नाही असे भेगडे यांनी म्हटले आहे.

त्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी सभागृहात याविषयी चर्चा घडवून तळेगाव नागरिकांना न्याय द्यावा असे आवाहनही भेगडे यांनी निवेदनात केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.