Talegaon News : पुणे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने प्रलंबित मागण्यांचे लेखी निवेदन

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने गेली अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांचे लेखी निवेदन पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करणार असल्याचे स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष काकासाहेब देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

पुणे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार महासंघाची विशेष सभा तळेगाव येथे आयोजित करण्यात आली होती. सभेला जिल्हा अध्यक्ष सोमनाथ वचकल, उपाध्यक्ष बाबूलाल नालबंद, हेमलता बढेकर,मोहन दुबे, प्रकाश खळदकर, केशव नगरे, कार्याध्यक्ष अशोक दळवी, सचिव सुरेश घोलप,सहसचिव श्रीकांत विरुळे,खजिनदार बंडोपंत भोर, अंकुश आंबेकर, गोपाळ गायकवाड, अशोक माने, शामराव गायकवाड, तानाजी घुले, दत्तात्रय घोजगे, सुरेश राक्षे, अमित शिळीमकर, ज्ञानेश्वर महाराज दाभाडे, छगन भोंगाडे यांचेसह जिल्ह्यातील रेशनदुकानदार उपस्थित होते.

यावेळी महासंघाने जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये शासनाच्या आदेशानुसार दुचाकी, चारचाकी आदीची माहिती घेऊन त्याचे सर्वेक्षण करावे. तो आदेश रद्द करावा, इ पॉस मशीन 2 जी ऐवजी 4 जी मिळावी. रेशनकार्डला आधार कार्ड लिंक करण्याची सक्ती करू नये, कोरोना काळात रेशन दुकानदारांनी जनतेची सेवा केली त्याबद्दल दुकानदाराना ‘कोरोना योद्धा’ म्हणून जाहीर करून ‘विमा संरक्षण’ मिळावे, प्रति क्विंटल मार्जीनमध्ये वाढ करावी, तसेच किमान उत्पन्नाची हमी देण्यात यावी.

केरोसिनचा पूर्वी प्रमाणे पुरवठा करण्यात यावा. गॅस सिलिंडर वाटप रेशन दुकानामार्फत करण्यात यावे. इतर राज्याप्रमाणे गहु व तांदुळाबरोबरच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची परवानगी द्यावी. याशिवाय मागील अनेक वर्षाच्या प्रलंबित मागण्या त्वरित सोडवाव्यात. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा अध्यक्ष सोमनाथ वचकल,उपाध्यक्ष बाबुलाल नालबंद यांनी दिला.

यावेळी संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांचा मावळ तालुका संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

रेशन दुकानदारांने नेभळट न राहता निर्भीडपणे आपला व्यवसाय केला पाहिजे आणि संघटना मजबूत केली पाहिजे तरच अधिका-यांवर वचक बसेल. असा खणखणीत इशारा राष्ट्रीय अध्यक्ष काकासाहेब देशमुख यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.