Talegaon: रेल्वे स्टेशन परिसरातील कारवाईच्या निषेधार्थ जनआंदोलनाचा इशारा

मुख्याधिकाऱ्यांच्या निलंबनाची सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशनची मागणी

एमपीसी न्यूज – तळेगाव रेल्वे स्टेशन परिसरात 40 ते 50 वर्षे जुनी घरे आणि दुकाने यावर नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेली कारवाई ही बेकायदेशीर असल्याचा आरोप महाराष्ट्र सोशल वेलफेअर असोसिएशनने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आशिष पालकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भातील निवेदन दिले. त्यावेळी राज्य उपाध्यक्ष संतोष जगताप, संपर्कप्रमुख अनिल कोळी, मावळ तालुका अध्यक्ष दीपक दाभाडे, तालुका कार्याध्यक्ष अरविंद गायकवाड आणि स्थाानिक नागरिक उपस्थित होते.

  • जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे, तळेगाव दाभाडे येथील जुना सर्वे नं. 30 ब, नवीन सर्वे नं. 491 या जमिनीवर येथील स्थानिक नागरिक 40 ते 50 वर्षांपासून व्यवसाय आणि निवास करीत होते.सदर जमिनीवर राहण्यासाठी व व्यवसाय करण्यासाठी जमीन मालक कडोलकर आणि दाभाडे सरकार यांनी संमती दिली होती. यामध्ये नगरपालिकडे कोणतेही कागदपत्रे, पुरावे नसतानाही आपला हक्क दाखवत होते. याबाबत नगरपालिकाचे मुख्याधिकारी यांना स्थानिकांनी पूर्ण माहिती दिली होती.

तरीही मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी पदाचा गैरवापर करुन सदरची राहती घरे आणि व्यावसायिक गाळे पाडून टाकले. आवारे यांनी अतिक्रमण कारवाई करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतीही परवानगी घेतली नव्हती. या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली असता सदर जमीन ही नगरपालिकेची नसून कडोलकर यांच्या वैयक्तिक मालकी हक्कांची आणि वहीवाटीची आहे. तसे कागदोपत्री पुरावेही आहेत.यावरून ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट होते.

  • या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्याधिकारी वैभव आवारे यांना निलंबित करावे. तसेच 40 ते 50 जणांचे झालेले नुकसान आवारे यांच्याकडून वसूल करण्यात यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. यासंदर्भात पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांनाही निवेदन देण्यात आल्याचे संघटनेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ही कारवाई पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावा मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी यापूर्वीच केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.