Talegaon Dabhade: तळेगाव स्टेशन परिसरातील सर्व दुकाने उद्यापासून तीन दिवस बंद

एमपीसी न्यूज – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने तळेगाव स्टेशन परिसरातील सर्व दुकाने उद्या (गुरुवार) पासून तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आज एका बैठकीत घेण्यात आला.

तळेगाव स्टेशन व्यापारी संघटनेच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या बैठकीस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड, तळेगाव जनविकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, माजी उपनगराध्यक्ष गणेश खांडगे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, नगरसेवक निखील भगत, संतोष शिंदे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किरण ओसवाल तसेच सर्व नगरसेवक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अत्यावश्यक सेवा म्हणून मेडिकल स्टोअर वगळता भाजीपाला व किराणमालाच्या दुकानांसह सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत एकमुखाने घेण्यात आला. गुरुवार, शुक्रवार व शनिवार हे तीन दिवस स्टेशन परिसरातील सर्व दुकाने बंद राहतील. रविवारी सर्व दुकाने नेहमीप्रमाणे उघडणार आहेत. रविवारी रात्री पुन्हा बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यावेळी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे किरण ओसवाल यांनी सांगितले.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन किरण ओसवाल यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.