Talegaon : तळेगाव शहर, परिसरात पुढील दोन दिवस पूर्ण संचारबंदी

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी तळेगाव दाभाडे शहर व परिसरामध्ये दि. 2 ते 3 मे पर्यंत फळे,  भाजीपाला,  दूध,   किराणा, मेडिकल या सुविधा सोडून संपूर्णपणे लॉकडाऊन (जनता कर्फ्यु ) जाहीर केला आहे. या बाबतचे आदेश त्यांनी तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासन, पोलीस प्रशासन व परिसरातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच यांना दिले आहेत.

कोरोना विषाणूमुळे सध्या आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेकामी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. त्यानुसार दि 30 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीमध्ये मौजे तळेगाव दाभाडे, परंदवाडी, शिरगाव, सोमाटणे, उर्से, आंबी, इंदोरी, सुदुंबरे, वराळे, नवलाख उंब्रे, माळवाडी, बेबडओव्हळ या गावामध्ये संपूर्ण लाॅकडाऊन करण्याबाबत निर्णय झाला.

त्यानुसार शनिवार दि 2  ते सोमवार दि. 3 मे या कालावधीमध्ये वर नमुद केलेल्या सर्व गावामध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली.    दरम्यान, या कालावधीत  नागरिकांच्या सोयीसाठी व  अचानक  होणारी गर्दी टाळण्यासाठी फळे,  भाजीपाला,  दूध,   किराणा इत्यादी सद्यस्थितीत चालू असलेल्या अत्यावश्यक सेवा सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत चालू राहतील. वैद्यकीय सेवा नेहमी प्रमाणे चालू  राहणार आहे.

तळेगाव दाभाडे, परंदवडी, शिरगांव, सोमाटणे, उर्से, आंबी, इंदोरी, सुदुंबरे, वराळे, नवलाख उंब्रे, माळवाडी, बेबडओव्हळ आदी गावांमध्ये शनिवार (दि 02) ते रविवार (दि 03 मे) या लाॅकडाऊन कालावधीमध्ये फळे,  भाजीपाला,  दूध,   किराणा व वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद राहतील याबाबत योग्य नियोजन करून नगर परिषद क्षेत्रामधे मुख्याधिकारी तळेगाव दाभाडे यांनी तसेच ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये गटविकास अधिकारी यांनी संबंधित पोलिस प्रशासनाशी समन्वय साधून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सुचनाही तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.