Tata News : वर्षाला 36 हजार वाहने स्क्रॅप करणारे केंद्र अहमदाबादमध्ये, टाटा आणि गुजरात सरकारमध्ये सामंजस्य करार

एमपीसी न्यूज – वर्षाला तब्बल 36 हजार वाहने स्क्रॅप करू शकणारे केंद्र गुजरात, अहमदाबाद येथे होणार आहे. याबाबत टाटा मोटर्सने पुढाकार घेतला असून टाटा मोटर्स आणि गुजरात सरकारमध्ये नुकताच सामंजस्य करार झाला आहे. आयुष्य संपलेल्या वाहनाचे स्क्रॅपिंग या ठिकाणी केलं जाणार आहे.

गांधीनगर मध्ये झालेल्या गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेत या सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या. यावेळी केंद्रिय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी आदी उपस्थित होते.

नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा उभारण्यासाठी गुजरात राज्य सरकार आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या वाहन स्क्रॅपेज धोरणाचा मसुदा तयार करणे तसेच, नियमांनुसार आवश्यक मंजुरी सुलभ करण्यासाठी बंदर आणि वाहतूक विभाग सहकार्य करणार असल्याचे टाटाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

युनिट, टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहन व्यवसाय युनिटचे कार्यकारी संचालक व अध्यक्ष गिरीश वाघ म्हणाले, ‘भागीदाराच्या माध्यमातून स्क्रॅपिंगच्या केंद्र उभारणी उपक्रमाला पाठिंबा देण्यात आम्हाला आनंद होत आहे. खरोखरच हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. आयुष्य संपलेल्या वाहनांच्या योग्य स्क्रॅपिंगमुळे इकोसिस्टम, भागधारक आणि पर्यावरण यांना फायदा होणार आहे. केंद्राचे स्क्रॅपेज धोरण स्वागतार्ह पाऊल आहे. यामुळे भारताची वाटचाल सुरक्षित आणि स्वच्छ वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने सुरू आहे. टाटा मोटर्स शाश्वत भविष्यासाठी वचनबद्ध असून या उपक्रमाला पाठिंबा देण्यास उत्सुक आहे,’ असे गिरीश वाघ म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.