Pimpri : हडपसर मधील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला भोसरी मधून अटक

पिंपरी-चिचंवड गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

एमपीसी न्यूज – गणेश उत्सव काळात रिक्षा चालकाचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला पिंपरी-चिचंवड  गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने अटक केली आहे. ही घटना 19 सप्टेंबर रोजी घडली होती. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. आरोपीला भोसरी येथील इंद्रायणी नगरमधील नवीन भाजी मंडई शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानातून अटक करण्यात आली.

राम गंगाधर लोंढे (वय 25, रा. येरुळ ता. शिरुर आनंतपाळ, जि. लातुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर रिक्षा चालक अकबर शेख (रा. मांजरी, हडपसर) यांचा गणेशोत्सव काळात खून केला होता.

गणेशोत्सव काळात रिक्षा चालक अकबर शेख हे त्यांची रिक्षा घेऊन थांबले होते. त्यावेळी रघुनाथ सुर्यवंशी (रा. लातूर) हा त्याच्या इतर तीन मित्रासह दारु पिऊन शेख यांच्या रिक्षातून गणपती पाहण्यासाठी जात होते. शेख यांना घरी लवकर जायचे असल्याने त्यांनी रिक्षा पुढे नेण्यास नकार दिला. तसेच आरोपींकडे झालेल्या प्रवासाचे पैसे मागितले. त्याचा राग मनात धरुन आरोपींनी शेख यांना मारहाण केली. यामध्ये शेख यांचा मृत्यू झाला. आरोपींनी मृतदेह मांजरी परिसरात फेकून दिला आणि त्यांची रिक्षा शिवाजीनगर परिसरात घेऊन गेले.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यातील रघुनाथ सुर्यवंशी याच्यासह तिघांना अटक केली. मात्र राम लोंढे अद्याप फरार होता. गुन्हे शाखा युनिट एकचे पथक भोसरी परिसरात गस्त घालत असताना हडपसर मधील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी इंद्रायणी नगर येथील नवीन भाजी मंडईजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात त्याच्या मित्राची वाट पाहत उभा आहे. त्यानुसार पोलिसांनी भाजी मंडई जवळील मोकळ्या मैदानात सापळा रचला. याची आरोपीला चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करुन त्याला अटक केली. पुढील कारवाईसाठी आरोपीला हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस हवालदार राजु केदारी, पोलीस शिपाई गणेश सावंत, प्रविण पाटील, अशिष बोटके यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.