Chinchwad : वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा खुनाच्या प्रयत्नातील आरोपी जाळ्यात

गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई

एमपीसी न्यूज – वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी आरोपीला मोहननगर येथे सापळा रचून मंगळवारी (दि. 1) अटक केली.

आकाश अंकुश भिसे (वय 25, रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक परिसरात गस्त घालत असताना पोलीस कॉन्स्टेबल देवा राऊत यांना माहिती मिळाली की, चिंचवड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी मागील एक वर्षापासून ओळख लपवून फिरत आहे. त्याच्याकडील पैसे संपल्याने तो मित्राकडे पैसे मागण्यासाठी मोहननगर येथील कमानीजवळ येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून आकाश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. पुढील कारवाईसाठी आरोपीला चिंचवड पोलिसांकडे देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के, पोलीस उपनरीक्षक संजय नीलपत्रेवार, पोलीस कर्मचारी शिवानंद स्वामी, देवा राऊत, अजित सानप, नामदेव कापसे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.