Pune : पुरस्कारामुळे समाजकार्याला प्रोत्साहन मिळते – प्रवीण तरडे

एमपीसी न्यूज – “समाजासाठी आपले काहीतरी योगदान असावे, असे प्रत्येकाला वाटत असते. त्याच प्रेरणेतून समाजकार्य होत राहते. केलेल्या कार्याचा उचित सन्मान झाला, तर आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते,” असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले.

युवा फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘स्वामी विवेकानंद युवा गौरव’, ‘डॉ. अब्दुल कलाम’, ‘डॉ. द्वारकादास कोटणीस’ व ‘राजीव गांधी समाजभूषण’ या पुरस्कराने सन्मानित करण्यात आले. टिळक रस्त्यावरील रंगदर्शन सभागृहात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक इनामदार, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास अबनावे, संयोजक नितीन भोसले, ऍड. वैशाली भोसले आदी उपस्थित होते.

प्रवीण तरडे म्हणाले, “आपण करत असलेल्या प्रत्येक चांगल्या कामातून समाजाच्या हिताचे काहीना काही होत असते. ज्या क्षेत्रात आपण कार्य करतो, ते उल्लेखनीय कसे होईल, याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. समाजाप्रती आपली बांधिलकी जपत ज्यांनी समाजसेवेसाठी आपले आयुष्य वाहिले, अशा व्यक्तींचा आदर्श ठेवून इतरांची दुःखे दूर करण्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न आपण करावा.”

डॉ. विकास आबनावे म्हणाले, “समाजसेवा करताना जाती-धर्माचा विचार होत नाही, याबद्दल त्यांचे कौतुक वाटते. आपल्या देशातील कर्तृत्ववान व्यक्तींचा पुतळा अनेक विविध देशात उभा केलेला पाहायला मिळतो. कारण त्यांचे काम उत्तुंग स्वरूपाचे आहे. तरुणाईकडे शिक्षणाचे अस्त्र आहे. त्याचा उपयोग समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी करावा. आपण इतरांना मदत केली, तर आपल्यालाही कोणीतरी मदत करेल, हा विचार केला पाहिजे. त्यातूनच समाजाची, देशाची प्रगती होईल.”

अशोक इनामदार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ऍड. वैशाली भोसले यांनी प्रास्ताविक केले. भैरवनाथ कानडे यांनी सूत्रसंचालन केले. नितीन भोसले यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.