Maval News : मावळातील ग्रामीण भागात वाढतेय अंधश्रद्धेचे पीक; बेलज येथील अनुचित प्रकार उघड

एमपीसी न्यूज (श्याम मालपोटे) – मावळ तालुका म्हणजे संतांची व शूरवीरांची भूमी असा परिचय सर्वत्र आहे, व अशा पुरोगामी विचारांच्या भूमीमध्ये दिवसेंदिवस अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटना वाढल्या आहेत. आंदर मावळमधील टाकवे – बेलज येथे बाभळीच्या झाडाच्या फांदीला एका महिलेचा फोटो, काळी बाहुली, लिंबू टांगलेल्या अवस्थेत दिसून आले आहे व त्या काळ्या धाग्याला एक चिठ्ठी बांधलेली सापडल्याने पंचक्रोशीत चर्चेला उधाण आले आहे.

मावळात दोन वर्षांपासून अंधश्रद्धा डोके वर काढत आहे, अशातच बेलज येथे एक वाटसरू रस्त्याने जात असताना त्याला रस्त्याच्याकडेला एका झाडावर फांदीला महिलेचा फोटो खिळ्याने ठोकलेल्या अवस्थेत आढळून आला,त्या इसमाने आणखी पडताळून पहिले असता तिथे काळी बाहुली,लिंबू व एक संदेश लिहिलेली चिठ्ठी आढळली.चिट्टीमध्ये माहिती अशी आहे कि “माझ्या मुलाच्या नशिबातून पुजा वेडी पिसी झाली पाहिजे,पुजा माझ्या मुलाच्या जीवनात वेडी पिसी होऊन गेली पाहिजे तिचे भाऊ आई वडील मामा मामी यांनी तिला याबद्दलकुठला त्रास दिला नाही पाहिजेल मुला बाळास त्रास दिला नाही पाहिजे,वेडी पिशी होऊन त्याला सोडुन जायला पाहीजे.” अशा आशयाचा संदेश चिट्टी मध्ये होता.

या आधीही असाच प्रकार घडलेला

टाकवे बुद्रुक येथील दोन वर्षांपूर्वी सरपंच निवडणूक वेळी टाकवे येथील इंद्रायणी नदी पुलावरील झाडाला अविनाश असवले, भूषण असवले, ऋषीनाथ शिंदे यांच्या नावाने झाडाला लिंबू बांधून खिळे ठोकले होते. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी टाकवे बुद्रुक येथील स्मशानभूमीत काळ्या पिशवीत एक काळे कोंबडीचे पिल्लू, वेगवेगळे धातु, लिंबू, टाचण्या असलेली पिशवी स्मशानभूमीत आढळली होती.

आज बेलज येथे असाच काहिसा प्रकार स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला आहे. या मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मावळ तालुक्यामधील टाकवे बुद्रुक परिसरामध्ये वारंवार असे प्रकार घडण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे यावर निर्बंध लावण्यासाठी स्थानिक पोलीस पाटलांनी पोलीस स्टेशनला तक्रार करून संबंधित पोलीस विभागाने अशा लोकांची चौकशी करून या लोकांना कडक शासन केले पाहिजे, त्यामुळे अशा लोकांकडून समाजामध्ये एक भीती पसरवण्याचे प्रमाण कमी होईल, असे वक्त्यव्य सामाजिक कार्यकर्ते राजू शिंदे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.