Hinjawadi : दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव हिंजवडी पोलिसांनी उधळला

एमपीसी न्यूज – दरोड्याचा तयारीत असलेल्या टोळीचा डाव हिंजवडी पोलिसांनी उधळून लावला. चार जणांना अटक करून त्यांच्याकडून कट्यार, गुप्ती, चाकू, कोयता, कात्री, लायटर आणि कार असा एकूण 1 लाख 50 हजार 515 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 22) रात्री अकराच्या सुमारास करण्यात आली.
शुभम मणीलाल जैन (वय 21), प्रकाश किशोर मोरे (वय 27), विशाल अरुण वाघ (वय 22), प्रतीक शिवाजी बारी (वय 20, सर्व रा. जामनेर, जळगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर प्रशांत पाटील, रामेश्वर राठोड हे दोघे घटनास्थळावरून पळून गेले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास सहा तरुण एका कारमधून आले आहेत. ते मारुंजी येथे कोलते पाटील स्कीमपासून नेरे गावाकडे जाणा-या रोडवर थांबले आहेत. त्यांच्याकडे घातक शस्त्रे असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची महिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांचे दोन साथीदार पळून गेले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या चार जणांकडून कट्यार, गुप्ती, चाकू, कोयता, कात्री, लायटर आणि कार असा एकूण 1 लाख 50 हजार 515 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ते मारुंजी येथे दरोडा टाकण्यासाठी आले असल्याची कबुली त्यांनी दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.