Bhosari News : शौचालयाच्या टाकीत सापडलेला ‘तो’ मानवी सांगाडा साठ वर्षांवरील पुरुषाचा 

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बालाजीनगर येथील सार्वजनिक सुलभ शौचालयाच्या टाकीत मानवी हाडांचा सांगाडा आढळला होता. मंगळवारी (दि.17) सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. हा सांगाडा कुणाचा असावा आणि तो कुणी टाकला असेल याबाबत चर्चा सुरू झाली होती. पोलिसांच्या तपासात हा मानवी सांगाडा साठ वर्षांवरील पुरुषाचा असल्याची माहिती आता समोर आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकीत सापडलेल्या व्यक्तीचा मृत्यू साधारण दिड वर्षांपूर्वी झाला असावा असा अंदाज आहे. हा मानवी सांगाडा साठ वर्षांवरील पुरुषाचा असून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे. याबाबत ‘डिएनए’ अहवाल सुद्धा मागवला आहे तसेच, ससून, वायसीएम व डिवाय पाटील सारख्या रुग्णालयाशी देखील पत्रव्यवहार करून माहिती मागवली जात आहे. वैद्यकीय विद्यालयात सुद्धा सांगाडा वापरला जातो त्यामुळे त्या दुष्टीकोणातून सुद्धा तपास सुरू आहे. वेगवेगळ्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे गवारे यांनी सांगितले.

दरम्यान, सापडलेला मानवी सांगाडा नेमका कुणाचा आहे ? तो तिथं कुणी आणि का टाकला ? हा खून आहे की आणखी काय ? या प्रश्नाची उत्तरे अजूनही अनुत्तरीतच आहेत. तुर्तास या सापडलेल्या हाडांच वय दिड वर्ष आहे व हा सांगाडा साठ वर्षांवरील पुरुषाचा आहे. एवढीच माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. पोलिसांच्या तपासाला गती मिळाली असून, लवकरच याबाबत सर्व माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

* काय आहे प्रकरण ?

बालाजीनगर, भोसरी येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सार्वजनिक सुलभ शौचालय बांधण्यात आले आहे. शौचालयाला पाणीपुरवठा करण्यासाठी बाजूलाच एक टाकी बांधण्यात आली आहे. त्या टाकीत मागील काही दिवसांपूर्वी मासे सोडण्यात आले होते. ते मासे काढून टाकीची स्वच्छता करण्यासाठी मंगळवारी (दि.17) सकाळी दोघेजण त्या टाकीत उतरले. टाकीची स्वच्छता सुरू असताना त्यांना एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मानवी हाडांचा सांगाडा आढळून आला. याबाबत नागरिकांनी एमआयडीसी भोसरी पोलिसांना माहिती दिली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.