Kamshet : चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी कामशेत पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत मे 2018 मध्ये घडलेल्या दरोड्याचा गुन्ह्यातील मुख्य आरोपी अद्याप फरार होता. त्या आरोपीच्या कामशेत पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी (दि. 23) मुसक्या आवळल्या. त्याच्यावर कामशेत, वडगाव आणि लोणावळा पोलीस ठाण्यात देखील चोरीचे गुन्हे दाखल आहेत. यामुळे तीन पोलीस ठाण्यातील चार गुन्ह्यांची उकल झाली आहे.

बाबाजी अरुण गायकवाड (वय 25, रा. कांब्रे, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडिवळे गावातील संगमेश्वर मंदिर रोडवर चार अज्ञात इसमांनी युवकाला पिस्तूलचा धाक दाखवून मारहाण केली. तसेच त्याच्याकडील बायोमेट्रिक मशीन, सॅमसंग टॅब, मोबाईल, डेबिट कार्ड व 1 लाख 77 हजार 710 रुपये रोख रक्कम असा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना 17 मे 2018 रोजी घडली. यावरून कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर कामशेत पोलिसांनी या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक केली. मात्र बाबाजी हा मुख्य आरोपी अद्याप फरार होता. मंगळवारी (दि. 23) बाबाजी त्याच्या गावात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कामशेत पोलिसांनी सापळा रचून मावळ तालुक्यातील कांब्रे गावातून त्याला अटक केली. बाबाजी याच्यावर वडगाव, कामशेत आणि लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून त्या गुन्ह्यांमध्ये देखील तो फरार होता. या कारवाईमुळे चार गुन्ह्यांची उकल झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.