Pimpri : शहरातील भटक्या गोवंशांची महानगरपालिकेने कायमस्वरूपी व्यवस्था करावी

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावरील मोकाट भटकणारे गोवंश रहदारी ठिकाणी भर रस्त्यामध्ये व चौकात थांबत असल्याने वाहतुकीला अडचण होऊन नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.  या अपघातात वाहनाचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत असून नागरिक व गोवंशही जखमी होत आहेत. शहरातील भटक्या गोवंशाची महानगरपालिकेने कायमस्वरुपी व्यवस्था करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्यावतीने आयुक्तांना निवेदनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील नागरिक या गोवंशाना भररस्त्यात खाद्यपदार्थ खायला घालत असतात. त्यामुळे शहरातील रस्त्यावर खाद्यपदार्थाचे रूपांतर कचऱ्यात होऊन “स्वछ भारत” या अभियानाची ऐशीतैशी होत आहे. शिवाय या गोवंशांची कासायांकडून कत्तलीसाठी चोऱ्या होत आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. पुढे जाऊन यामुळे हिंदू-मस्लिम दंगल भडकण्याची शक्यता असल्याने या सर्व गोष्टींचा विचार करून विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्यावतीने असे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये व असे अनुचित प्रकार घडल्यास त्यास पूर्णतः महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल त्यासाठी वेळीच उपाय योजना करून मोकाट फिरणाऱ्या गोवाशांची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, असे निवेदन महानगरपालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांना देण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील या भटकत्या गोवंशांची योग्य ती काळजी घेऊन लवकरात लवकर रहदारी रस्ते, चौक गोवंश मुक्त करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आले आहे. यावर महापालिका आयुक्त हार्डीकर यांनी लवकरात लवकर याची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले आहे.

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, पिंपरी चिंचवड जिल्हावतीने निवेदन देण्यासाठी विहिंप जिल्हा अध्यक्ष शरदराव इनामदार, सोलापूर विभाग संयोजक संदेशजी भेगडे, सोलापूर विभाग सह संयोजक कुणाल साठे, जिल्हा मंत्री नितीन वाटकर, जिल्हा सहमंत्री धनंजय गावडे, जिल्हा सहमंत्री संजय शेळके, बजरंग दल जिल्हा संयोजक नाना सावंत, संदीपभाऊ वाघेरे, जिल्हा सह संयोजक अभिजित शिंदे, ग्रामीण जिल्हा संयोजक अमित भेगडे, गोरक्षा प्रमुख गौरव पाटील, गौरव कुदळे, दादा अच्छरा, निलेश देशमुख, बाबा लांडगे, निलेश चासकर, अनिकेत सस्ते, मंगेश गराडे, मोहित बुलानी व मोठ्याप्रमाणात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल गोरक्षक व कार्यकर्ते उपस्थित होते. अशी अधिकृत माहिती विहिंप प्रचार प्रसिद्धी प्रमुख मुकुंद चव्हाण यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.