Maval : नव्याने स्थापन केलेल्या मावळ तालुका दिंडी समाज ट्रस्टची मान्यता रद्द

दिंडीतील वारक-यांना विश्वासात न घेतल्याचा ठपका

एमपीसी न्यूज – नव्याने स्थापन करण्यात आलेल्या मावळ तालुका दिंडी समाज ट्रस्टला सह धर्मदाय आयुक्त दिलीप एम देशमुख यांनी रद्दबातल ठरविले आहे. पदाधिका-यांना विश्वासात न घेता,  खोटी कागदपत्रे दाखल करून ट्रस्टची स्थापना करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला होता, अशी माहिती अध्यक्ष नरहरी केदारी, महादुबुवा सातकर, राजाराम शिंदे, शिवाजी सातकर, नारायण ठाकर, गणेश काजळे आदींनी, मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या कार्यालयात आज (दि 1) पत्रकार परिषदेत दिली.

धर्मदाय आयुक्तांकडून 1 नोव्हेंबर 2018 ला नवीन ट्रस्टचे नुतनीकरण करून घेण्यात आले. त्यामध्ये अॅड रवींद्र दाभाडे, अॅड तुकाराम काटे, ज्ञानेश्वर शिंदे, शांताराम काजळे, तुकाराम गाडे व इतर सदस्यांचा समावेश होता. या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या विरोधात नरहरी आबाजी केदारी, राजाराम शिंदे, गणेश काजळे, ज्ञानेश्वर जांभुळकर यांनी धर्मदाय आयुक्तांकडे दि 1 जानेवारी 2019 रोजी अपील केले होते.

हे विश्वस्त मंडळ स्थापन करताना मावळ तालुका दिंडी समाजातील वारकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली. नियमितीकरण करण्याच्या नावाखाली हयात व्यक्तींना मयत दाखवून स्वतःची व मर्जीतील व्यक्तींची नावे विश्वस्त म्हणून घेतली आहेत. त्यामुळे या ट्रस्टची मान्यता रद्द करावी, अशी मागणी या अपिलात करण्यात आली होती. दोन्ही बाजूंनी सादर केलेले पुरावे विचारात घेऊन धर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी निकाल दिला आहे व नवा ट्रस्ट रद्दबातल केला आहे.

मावळ तालुका दिंडी समाज ट्रस्टची स्थापना 1995 मध्ये माजी आमदार रघुनाथ दादा सातकर यांनी केली होती. आतापर्यंत मावळ तालुका दिंडी समाजाच्या माध्यमातून आळंदी कार्तिकी वारी व पंढरपूर आषाढी पायी वारी चालू आहे. आळंदी व पंढरपूर येथे संस्थेच्या मालकीच्या धर्मशाळा आहेत. मात्र संस्थेचा कारभार सुरळीतपणे करता यावा व नियमितीकरण करावे यासाठी आषाढी वारीच्या वेळी वारक-यांची बैठक झाली.

या बैठकीत सर्व वारक-यांना विश्वासात घेऊन सर्वमान्य विश्वस्त मंडळ निवडण्याचे ठरले होते, असे असताना कुणालाही विश्वासात न घेता खोटी कागदपत्रे दाखल करून विश्वस्त मंडळ स्थापन केले.  हा नवीन केलेला ट्रस्ट वारक-यांना मान्यच नव्हता. त्यामुळे न्यायालयात धाव घेतली.

हा विजय आमचा नसून मावळ तालुक्यातील वारकरी संप्रदायाचा आहे, अशी प्रतिक्रिया अध्यक्ष नरहरी आबाजी केदारी, राजाराम शिंदे, महादुबुवा सातकर, गणेश काजळे, नारायण ठाकर, शिवाजी सातकर आदींनी पेढे वाटून दिली.

फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे धाव

ट्रस्ट स्थापन करताना जिवंत माणसे मृत दाखवून, न्यायालयाची व वारक-यांची फसवणूक केल्याप्रकरणी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा,  यासाठी पुणे येथील बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.